ब्युरो रिपोर्ट झी 24 तास नागपूर : हिवाळी अधिवेशन निम्मं सरलं तरीही झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा विरोधकांनी विधिमंडळात का मांडला नाही असा सवाल उपस्थित होतोय. या प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल हायकोर्टानं सवाल केला. मात्र असं असतानाही विरोधकांचं या प्रकरणावर मौन धारण केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत विरोधकांचं तेरी भी चूप, मेरी भी चूप धोरण आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच पार्थ पवारांना विरोधकांचाही सॉफ्ट कॉर्नर आहे का असा प्रश्नही विचारला जातो. त्यामुळे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दडपलं जाणार का असा प्रश्न उपस्थित होतो.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण झी 24 तासनं उघडकीस केलं. झी 24 तासनं माध्यम म्हणून या गैरव्यवहाराला वाचा फोडली. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून विरोधकांवर आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीनं केलेल्या गैरव्यवहारावरुन सभागृह डोक्यावर घेतील अशी अपेक्षा होती. अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी राणाभीमदेवी थाटात तशा गर्जनाही केल्या होत्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण तडीस नेऊ असं सांगत होते. अधिवेशनाचा पहिला दिवस उजाडला, पण विरोधकांनी सभागृहात या विषयावर ब्र ही काढला नाही. दुसरा दिवसही तसाच गेला. तिस-या दिवशीही विरोधक पुणे जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा काढायला तयार नव्हते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते तर पहिल्या दिवशी हा मुद्दा काढायची गरजच नाही असं सांगत फिरत होते.
थंडा करके खाओ या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणावर उत्तर देणं टाळलं पण जेव्हा आम्ही विचारलंच तेव्हा काँग्रेस नेते संधी मिळेल तेव्हा हा मुद्दा उपस्थित करु असं सांगून वेळ मारुन नेली.
झी 24 तासनं हे प्रकरण जेव्हा धसास लावल तेव्हा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे श्रेय घेण्यासाठी पुढं आले होते. पण अधिवेशनात हा जमीन मुद्दा लावून धरण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्या कोणत्याही आमदाराला सांगितल्याचं ऐकिवात नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अधिवेशन अजून संपलेलं नाही असं सांगत आम्ही जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा जरुर मांडणार असं सांगत स्वतःलाच धीर देत होते.
विरोधकांच्या या बोटचेप्या भूमिकेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. लोकशाहीत सत्ताधा-यांनी झोपेचं सोंग घेतलं तर त्यांना जागं करण्याचं काम विरोधी पक्षांचं आहे. पण पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात विरोधकच झोपी गेलेत की काय असा प्रश्न सामान्य जनता विचारु लागली आहे.