![]()
पुण्यात हॉटेल कर्मचाऱ्यांकडून एका डिलिव्हरी बॉयला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलचे गेट उघडण्यास सांगितल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
मांजरी परिसरातील बेल्हेकर वस्ती येथील ‘हॅपी द पंजाब’ हॉटेलमध्ये ही घटना घडली. अरमान परी (२३) आणि इतर तीन कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष सुनील भगत (२४, रा. मांजरी फार्म, तुपे पार्क, मांजरी हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी आशिष भगत हे एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. ८ डिसेंबर रोजी रात्री ते त्यांच्या मित्रासोबत जेवण करण्यासाठी ‘हॅपी द पंजाब’ हॉटेलमध्ये गेले होते. रात्री दीड वाजता जेवण झाल्यावर ते घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांनी हॉटेलचे बंद झालेले गेट उघडण्यास सांगितले.
याच कारणावरून भगत आणि हॉटेलमधील कामगारांमध्ये वाद झाला. यावेळी कामगारांनी भगत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, रॉडने त्यांच्या हातावर मारल्याने हात फ्रॅक्चर झाला आणि कड्याने डोक्यातही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर भगत यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
गप्पा मारत थांबलेल्यावर हल्ला करणाऱ्या एकाला अटक
धायरी येथील कोळेश्र्वर मंदिराजवळी गिरीजा हॉटेल समोर गप्पा मारत थांबलेलया तरूणाला काही एक कारण नसताना शिवीगाळ करून दगडाने व कुंडी डोक्यात घालून मारहाण करणाऱ्या एकाला नांदेडसिटी पोलिसांनी अटक केली. गौरव राजू घाडगे (19, रा. वडगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे साथीदार सोन्या हिवाळे, यश देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रसाद गणेश भोपकर (33, रा. शिवअपार्टमेंट, रायकरनगर धायरी) यांनी याबाबत नांदेडसिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.