Maharashtra Council Rohit Pawar In Trouble: विधानपरिषदेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्याविरुद्ध भाजपाचे आमदार प्रविण दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी असलेल्या सूर्यकांत मोरेने जाहीर भाषणात विधान परिषदेचा, विधान परिषद अध्यक्षांचा आणि विधान परिषदेच्या सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप प्रविण दरेकरांनी केला. सूर्यकांतविरोधातही हक्कभंगचा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रविण दरेकरांनी नेमकी काय विधानं करण्यात आली हे सविस्तरपणे सांगितलं.
नेमकी काय आक्षेपार्ह विधानं केली?
“सन्माननिय सदस्य, विधान परिषदेचे सभापतींबरोबरच सभागृहाचा अवमान केला. सभागृहाचा विशेष हक्काचा भंग केला आहे. तांबड्या रंगाच्या बिल्लावाल्याला कोणी विचारत नाही. हिरव्या रंगाच्या बिल्लावाल्याला लगेच बसा म्हणतात, असं म्हणाले. यावरुनच लाल बिल्ला असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्यांना कमी लेखण्यात आलं. विधानसभेच्या सदस्यांपेक्षा विधानपरिषदेच्या सदस्यांना कमी लेखण्यात आलं. चुकीची, असत्य आणि विधानपरिषदेचा अवमान सूर्यकांत मोरेंनी केला आहे. विधानपरिषदेचे आणि त्यातील सदस्यांनी नेमणूक, त्यांचं व्यक्तीमत्व सर्वच बाबींसंदर्भात हे विधान होतं. सर्व सदस्यांना अपमान करण्यात आला. माननिय सभापतींचं काम हे केवळ सभागृहातील मतदानाची मोजणी करणे एवढेच आहे. या वक्तव्यातून विविध कर्तव्य, निर्णयांबद्दल आणि सभापतींचा कामाचा अवमान झाला आहे. घटनात्मक कर्तव्य पार पडाणाऱ्या सभापतींबद्दल नुसतं आपलं फिरायचं मागे लवाजमा घेऊन असं विधान केलं. कामकाजाबाबत असं विधान करत प्रतिकूल परिणाम होईल असं हे विधान आहे,” असं दरेकरांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं.
सभापतींच्या प्रतिमेचा जाणीवपूर्वक अवमान
“पंचायत समितीच्या सभापतीला जे अधिकार आहेत ते अधिकार विधान परिषदेचे सभापतींला नाहीत. हे संसदीय लोकशाहीमधील विधान परिषदेचे सभापतींच्या प्रतिमेचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा हा प्रकार आहे. विधान परिषदेचे सभापतींसमोर 288 सदस्य बसत नाहीत केवळ 70 सदस्य बसतात, असं म्हणून सभापतींबद्दल टीका टिप्पणी करण्यात आली. या माध्यमातून अवमान करण्यात आला. माननिय सभापती कायदे बनवत नाही असं म्हणणं हे माननिय सभापती आणि सभागृहाचा अवमान आहे,” असं प्रविण दरेकर म्हणाले.
लाल रंग दुष्काळाचं प्रतिक म्हणाला
“केवळ विधानसभेतून संमत होऊन आलेल्या विधेयकावर मतदान होतं असं म्हणून कामकाजाबद्दल टीका करण्यात आला. केवळ 30 दिवसच काम होतं असं आक्षेपार्ह विधान केलं. जनमानसात संभ्रम निर्माण करणारं विधान करण्यात आला. विधान परिषदेच्या रचनेबद्दल बोलताना ही रचना लाल रंगात असून हा लाल रंग दुष्काळाचं प्रतिक आहे असं आक्षेपार्ह टीका करण्यात आली. यामधून सभागृहाचा अवमान करण्यात आला,” असा आरोप दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव मांडताना केला.
शरद पवार, सुप्रिया सुळेंना उडालेला ब्लब म्हणायचं का?
“प्रस्ताव पुढे पाठवावा अशी मी मागणी करतो. व्हिडीओ क्लिप आपल्याकडे पाठवतो 1993 ते 1996 सभासद म्हणून 1995-96 काळात विरोधीपक्ष नेते होते. 2014 पासून ते राज्यसभेवर कार्यरत आहेत. सुप्रिया सुळे 2006 ते 2009 मध्ये राज्यसभेत होत्या. उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेचे सदस्य होते. आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांना देखील आपण उडालेले बल्ब म्हणायचं का?” असा सवाल दरेकरांनी विचारला.

थेट तीन नेत्यांची नावं घेतली
“हा प्रकार घडत असताना विधानसभेचे सदस्य रोहित पवार, आहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आणि उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या ठिकाणी उपस्थित होते. सुषमा अंधारेंच्या नेत्यांना म्हणजेच विद्यमान सदस्य असलेल्या उद्धव ठाकरेंना हे विधान लागू होतात का प्रश्न पडतो. या सदस्यांपैकी कोणीही यावर आक्षेप घेतला नाही. हे सदस्य मोरेंच्या वक्तव्याला हसून हसून दाद देत होते. लोकप्रतिनिधींसमोर वरिष्ठ सभागृहाची प्रतिमा मलिन होत असताना त्यांनी आक्षेप घेतला नाही ही शोकांतिका आहे,” असंही दरेकर म्हणाले.
“कारवाई होणार नसेल तर या विधानांमधून समाजात वाईट संदेश जाईल. सभागृहाबद्दल सन्मान राहणार नाही. चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी करतो,” असं म्हणत दरेकरांनी आपलं भाषण संपवलं.
आमदारकी धोक्यात?
हक्कभंगाच्या प्रस्तावानंतर तो मान्य केल्यास संसदीय प्रक्रियेनंतर अत्यंत गंभीर प्रकरणात (उदा. भ्रष्टाचार किंवा गंभीर उल्लंघनासंदर्भात) आमदाराची सभागृहातून हकालपट्टी केली जाऊ शकते. यामुळे त्यांची सदस्यता संपुष्टात येते आणि पोटनिवडणूक होते. त्यामुळे आता खरोखरच या प्रकरणातील प्रस्ताव स्वीकारला गेला तर रोहित पवारांच्या आमदारकीवर टांगती तलवार असेल अशी चर्चा सुरु झाली आहे.
सूर्यकांत कोण आहे?
सूर्यकांत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (शरदचंद्र पवार गटाचा) पदाधिकारी आहे. तो अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नापूर गावचे रहिवासी आहेत. नोव्हेंबर 2025 च्या विधान परिषद सभागृह आणि सभापती प्रा. राम शिंदे यांच्याविरुद्ध अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपामुळे सूर्यकांत चर्चेत आहे.
विवाद आणि आरोप
23 नोव्हेंबर 2025 रोजी जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत (ज्यात खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार आणि सुषमा अंधारे उपस्थित होते) मोरे यांनी विधान परिषद सभागृह आणि सभापती राम शिंदे यांच्यावर टीका करताना अपमानजनक विधान केले, ज्यामुळे सभागृहाचा अवमान झाल्याचा आरोप आहे. भाजपचे विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी याबाबत विशेषाधिकार भंगाची सूचना दिली असून, विधान मंडळ सचिवालयाने मोरे यांना नोटीस पाठवली आहे. 2 डिसेंबरपर्यंत खुलासा सादर करण्याची मुदत देण्यात आलेली. या प्रकरणाची सुनावणी सभापती राम शिंदे यांच्यासमोर होईल. दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे विधान केवळ शिंदे यांच्यावर नव्हे, तर शरद पवार, सुप्रिया सुले, उद्धव ठाकरे सारख्या सदस्यांवरही लागू होत असल्याचे सांगितले. हा घटनात्मक विशेषाधिकारांचा उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.