![]()
आम्ही आता सहन करणार नाही. जर मुंबईत कुठल्याही मारवाड्याला धक्का लागला किंवा मारहाण झाली, तर आता ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल. मोदींनी सांगितले होते ‘बटोगे तो कटोगे’, मी सांगतोय ‘तुम बटोगे तो पिटोगे’, अशा शब्दांत जैन मुनी निलेशचंद्र यांनी आक्रमक भूमिका
.
कबुतरांच्या मुद्द्यावरून बोलताना मुनी निलेशचंद्र म्हणाले की, आता प्रत्येक बिल्डिंग आणि टॉवरमध्ये जाऊन आम्ही पशू-पक्ष्यांसाठी जनजागृती करणार आहोत. ज्याप्रमाणे गोरक्षक आहेत, त्याच धर्तीवर आम्ही आता प्रत्येक वॉर्डात ‘कबूतर रक्षक’ तयार करत आहोत. राज्य आणि केंद्र सरकारने कबुतरांना दोन तास खाद्य टाकण्याची परवानगी दिली आहे, मग दादरच्या कबूतरखान्याला ही परवानगी का नाही? जोपर्यंत दादरमध्ये दोन तास खाद्य टाकण्याची मुभा मिळत नाही, तोपर्यंत आमची ही जनजागृती मोहीम सुरूच राहील.
भाषावाद फक्त राज ठाकरेच संपवू शकतात
राज्यातील भाषावादावर भाष्य करताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केले. भाषावादामुळे समाजात दरी निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर जर महाराष्ट्रावर कुणी मनापासून प्रेम करत असेल, तर ते राज ठाकरे आहेत. हा भाषावाद केवळ तेच संपवू शकतात. त्यांनी आमच्या जैन समाजाशी संवाद साधावा, ते सांगतील तसे आम्ही वागायला तयार आहोत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरही त्यांनी राज ठाकरे आणि यशवंत जाधव यांच्या भूमिकांचे समर्थन केले.
जय महाराष्ट्र आणि जय जिनेंद्र
मराठी आणि मारवाडी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न व्होट बँकेसाठी केला जात असल्याचा आरोप मुनींनी केला. ते म्हणाले, जेवढा सन्मान तुम्ही मराठी भाषेचा करता, त्यापेक्षा जास्त आम्ही करतो. राजस्थान आमची जन्मभूमी असली, तरी महाराष्ट्र आमची कर्मभूमी आणि ‘मोठी आई’ आहे. यापुढे प्रत्येक फ्लॅटवर ‘जय महाराष्ट्र, जय जिनेंद्र’ असा नारा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांचे फोटो एकत्र असतील.
मारवाडी समाजाला एकतेचे आवाहन
बाहेरून आलेल्या प्रवाशांची आणि आमची तुलना करू नका, असे सांगतानाच त्यांनी मारवाडी समाजाला संघटित राहण्याचे आवाहन केले. कुणी मारवाडीला मारहाण करत असेल आणि कुणी फोटो काढू नका असे सांगत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. आता आम्ही संघटित होऊन जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र यांनी दिला आहे.