विदर्भात येत्या काही दिवसांत मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवार आणि मंगळवारी विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
.
शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानतज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार या दोन दिवसांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मान्सूनची ट्रफरेषा फिरोजपुर, दिल्ली, लखनऊ, पाटना आणि दिघा या शहरांकडे सरकली आहे.
१३ ऑगस्टला वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात पावसाचे प्रमाण वाढू शकते. १५ ऑगस्टपर्यंत पश्चिम विदर्भात काही ठिकाणी विखुरलेला पाऊस पडेल. पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल.
संपूर्ण विदर्भात सार्वत्रिक पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १६ आणि १७ ऑगस्टला विदर्भातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल.