अमरावती जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची अंतिम प्रभाग रचना १८ ऑगस्टनंतर जाहीर होणार आहे. विभागीय आयुक्तांकडून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सोमवारी प्रभाग रचनेचा मसुदा सुपूर्द करण्यात आला.
.
नागरिकांच्या आक्षेप आणि सूचनांवर विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांचा समावेश या दस्तऐवजात केला जाणार आहे. १ ऑगस्टला विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या दालनात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आक्षेपांची सुनावणी झाली.
नव्या प्रभाग रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यातील एक मतदारसंघ कमी करून अचलपूर तालुक्यात एक मतदारसंघ वाढवण्यात आला आहे. मेळघाटच्या दोन्ही तालुक्यांतील एका मतदारसंघाशिवाय इतर सर्व मतदारसंघांची नावे बदलली आहेत.
काही नागरिकांनी जवळची गावे सोडून दूरची गावे एखाद्या मतदारसंघात समाविष्ट करण्याबाबत आक्षेप नोंदवले आहेत. अंतिम मसुद्यात या आक्षेपांचा विचार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षणाची प्रक्रिया सुरू होईल. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागा ठरवल्या जातील. त्याचबरोबर महिलांसाठी राखीव जागा आणि खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षणही निश्चित केले जाईल.