शून्य विद्युत अपघातासाठी जनजागृती अभियानातील विविध उपक्रमांत लोकसहभागाचे महावितरणने नवीन पाच विक्रम नोंदवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या दोन्ही संस्थांच्या वतीने सोमवारी (दि. ११) पाचही विक्रमाच्या नोंदी
.
मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षक कश्मिरा मयंक शाह यांनी विद्युत सुरक्षा अभियानातील लोकसहभागाच्या पाच विक्रमांची घोषणा केली. त्यांनी या दोन्ही संस्थांच्या वतीने संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत (मानव संसाधन), प्रसाद रेशमे (प्रकल्प), स्वाती व्यवहारे (वित्त) यांना प्रमाणपत्र व सन्मानपदक प्रदान करून महावितरणचा सन्मान केला. यावेळी एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षक कश्मिरा शाह यांनी महावितरणच्या पाचही विक्रमांची माहिती दिली. संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितले, की ‘लोकसहभागातून शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या अभियानाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येईल.’
महावितरणने यंदा २० व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीसाठी राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते यात सुरक्षा संदेश देणाऱ्या मॅरेथॉनमध्ये ११ हजार ८८१, ऑनलाइन प्रश्नमंजूषेत ९६ हजार १५०, शालेय निबंध व चित्रकला स्पर्धेत ७ हजार ५९३, विद्युत सुरक्षेच्या रॅलीमध्ये २७ हजार १५५ जण सहभागी झाले होते. तसेच दि. ६ जूनला एकाचवेळी ४२ हजार २०१ जणांनी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली. यासह महावितरणकडून १ कोटी ९२ लाख ७९ हजार ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे तर ३५ लाख ७३ हजारांवर ग्राहकांना नोंदणीकृत ईमेलद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यात आला. या सर्व उपक्रमांत तब्बल २ लाख ११ हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
भारत सरकारकडे नोंदणीकृत व वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीशी संलग्न एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आशियातील सर्व प्रमुख राष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड्सचे परीक्षण करून नोंदी घेतल्या जातात. त्यानुसार महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानामध्ये प्रामुख्याने विद्युत सुरक्षा रॅली, मॅरेथॉन, विद्युत सुरक्षेची शपथ, ऑनलाइन प्रश्न मंजूषा तसेच ‘एसएमएस’ व ‘इमेल’द्वारे ग्राहक संवादामध्ये लोकसहभागाच्या विक्रमांची नोंद केली. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. त्यानंतर या नोंदी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड कडे पाठविण्यात आल्या. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड प्रोटोकॉल नुसार परीक्षण झाल्यानंतर या विक्रमांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
कार्यक्रमात कार्यकारी संचालक परेश भागवत यांनी अभियानाची माहिती दिली. उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमाला मुख्य अभियंते सर्वश्री मनीष वाठ, दत्तात्रेय बनसोडे, प्रशांत दानोळीकर, हरिश गजबे, वादिराज जहागिरदार, दीपक कुमठेकर, मिलिंद दिग्रसकर, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आदींची उपस्थिती होती.