हिंगोली शहरातील बांगर नगर भागात एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून या प्रकरणी रविवारी ता. १० रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळावरून चोरट
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बांगर नगर भागात राज जोगपीठे यांचे घर आहे. राखी पौर्णिमे निमित्त ते बाहेरगावी गेले होते. यावेळी घराला कुलुप होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधूस केली. तसेच घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने घेतले.
यानंतर चोरट्यांनी शेजारीच असलेल्या अभियंता रामेश्वर बोरकर यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातही नासधुस करून काही ऐवज पळविला तर आणखी एका नागरिकाच्या घरी चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या चोरीच्या घटनांचा अधिक तपशील मिळाला नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगमनाथ परगेवार, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, गणेश लेकुळे, शेख मुजीब, गणेश वाबळे, संतोष करे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. त्यानंतर ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या ठिकाणावरून चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले आहेत. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.