Pandharpur Mandir : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने तुलसी अर्चन पूजाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुरुवातीला मराठीत पूजा सांगण्यात येत होती. मात्र एका हिंदी भाषिक भाविकाच्या आग्रहामुळे हिंदीत पूजा सांगण्यात आली. असा आरोप राहुल सातपुते नावाच्या एका मराठी भाविकाने केला आहे. याबाबत जाब विचारला असल्यास आपल्याला संबंधित पंडिताकडून दमदाटी करत बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. असा आरोपही या भाविकाने केलाय. दरम्यान मंदिर समितीच्या अधिका-यांनी हे आरोप फेटाळले आहेत. पुजेचे मंत्र हे मराठी आणि संस्कृत भाषेतूनही पठण करण्यात येतात. इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही. असं मंदिर समितीने म्हटलंय.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना श्रींच्या विविध प्रकारच्या पुजा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये श्रींच्या तुळशीपुजेचा समावेश आहे. सदर पुजा बुकींगसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, ही पुजा देशभरातील भाविक घरबसल्या बुकींग करून पुजेसाठी येत असतात. या भाविकांना पुजेची माहिती व्हावी आणि पुजेच्या अनुषंगाने सुचना देण्यासाठी प्राधान्याने मराठी व आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतूनही सुचना देण्यात येतात. मात्र, पुजेचे मंत्र हे मराठी व संस्कृत भाषेतून पठण करण्यात येते. यामध्ये पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही.
सदरच्या तुळशी पुजेवेळी श्री संत तुकाराम भवन येथे आचमन करून व संकल्प करण्यात येतो. त्यानंतर श्री गणपतीचे स्मरण, श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे स्मरण व विष्णूसस्त्रनाम पठण करून पुजा करण्यात येते. यासाठी मराठी व संस्कृत भाषेचा वापर करण्यात येतो. तथापि, पुजे संबंधी माहिती सर्व भाविकांना व्हावी या उद्देशाने प्राधान्याने मराठी व आवश्यकता भासल्यास हिंदी व इतर भाषेतून माहिती देण्यात येते असा खुलासा करण्यात आला आहे.
श्री राहूल सातपुते या भाविकांने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधितांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
राहुल सातपुते यांची व्हायरल पोस्ट
पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तर्फे तुलसी अर्चन पूजाचे आयोजन होते. माझ्या कुटुंबाने त्यात सहभाग घेतलेला. समितीच्या तुकाराम भुवनात साधारण ३०-३५ कुटुंबं पूजेसाठी जमली होती. समिती तर्फे एक गुरुजी स्टेजवर बसून सर्वांना सूचनांच्या माध्यमातून पूजा घडवत होते. सुरुवातीला सूचना मराठीत दिल्या. तेवढ्यात ह्या ३०-३५ कुटुंबापैकी एक कुटुंब म्हणालं की त्यांना मराठी कळत नाही, म्हणून पूजा हिंदीत घ्यावी. गुरुजी लगेच हसत हसत होकार देऊन संपूर्ण पूजा हिंदीत सुरू केली.
मी हात वर केला आणि नम्रपणे सांगितलं – “आपण महाराष्ट्रात आहोत. आमच्या कुटुंबाला हिंदी कळत नाही. महाराष्ट्राची राजभाषा मराठी कळते. त्यामुळे कृपया मराठी भाषेत सूचना द्या.” पण यावर गुरुजी माझ्यावर चिडले आणि माईकवरूनच म्हणाले – “या माणसाचा काय विषय आहे? सिक्युरिटी आणि समितीवाले इकडे या आणि या माणसाशी बोला. त्याशिवाय पुढे पूजा सुरू करता येणार नाही.” अस म्हणून त्यांनी माईक बंद केला. उपस्थितांमध्ये चुळबुळ झाली. माझ्या समर्थनार्थ कदाचित ‘आपल्याला पूजेतून बाहेर काढतील’ या भीतीने एकही मराठी कुटुंब देखील पुढे आल नाही.
सिक्युरिटी आणि समिती चे लोक आले आणि त्यांनी मला अश्वस्थ केले की पूजा सर्वांसाठी मराठी आणि त्या एका कुटुंबासाठी हिंदी मधे होईल. ते अर्थातच समाधानकारक उत्तर नव्हत. पूजा मराठीतच व्हायला हवी होती. त्यांच ऐकून मी खाली बसलो. गुरुजींनी माईक हातात घेतला आणि आमच्या कडे बघून म्हणाले “तुमच्या एकट्या कुटुंबासाठी आम्ही मराठी मधून पूजा घेऊ शकत नाही.” हे अजिबात खरे नव्हते. एक हिंदी कुटुंब सोडून सर्व कुटुंबे मराठी होती. पण गुरुजींनी आमच एक मराठी कुटुंब अल्पसंख्याक आहे अस भासवलं आणि पूजा हिंदी तून सुरू केली. गुरुजींची “छुट्टी तुळशी उसमे डालिए” वगैरे तत्सम वाक्य कानांवर पडत होती. पूर्ण पूजा हिंदी मधून पार पडली. हिंदी समजत नसल्याने आम्हाला त्यांच्या सूचना समजत नव्हत्या. योग्य वागणूक न दिल्याने आणि आमच्या मराठी भाषेचा मान राखल्याने माझ मन तर केव्हाच त्या पूजेवरून उडाल होत. मराठीचा आग्रह धरल्याने आमच्या मराठी कुटुंबास महाराष्ट्राच्या पंढरपुरात जणू दोषी ठरवण्यात आल होत. ह्याला बाकी मराठी कुटुंबांनी बघ्याची भूमिका घेतली त्याच मला जास्त दुःख वाटल.
पूजा संपल्यावर मी गुरुजींना समक्ष भेटून हात जोडून म्हणालो – “माऊली, तुम्ही माझ्या कुटुंबाला मराठीचा आग्रह धरला म्हणून सार्वजनिक रित्या माईकवरून दोषी ठरवलंत. अहो, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह नाही धरायचा, तर आम्ही मराठीचा आग्रह कुठे धरायचा? मला तुमची हिंदीत केलेली पूजा नीटशी कळलीसुद्धा नाही.”
गुरुजी म्हणाले – “अहो, पण एक कुटुंब होतं ना ज्यांना मराठी कळत नव्हतं. मी ही पूजा मराठीतच करतो, पण एखादं अमराठी कुटुंब असेल तर हिंदीत करतो. आम्ही सर्वसमावेशक आहोत. तुम्ही आता जा, तुम्हाला समितीवालेच समजावतील.”
मी म्हटलं – “ते मी करणारच आहे. मी समितीला पत्रव्यवहार करणार आहे. मी काही काशी विश्वेश्वराच्या मंदिरात मराठीचा आग्रह धरलेला नाही. किंबहुना आम्ही मराठी माणस तिकडे किंवा तिरुपती ला कधी मराठी बोला हा आग्रह धरत नाही. आम्ही तितके सुजाण आहोत. पण निदान महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या दरबारात मराठीचा आग्रह धरला, आणि तुम्हीच त्याला चूक ठरवलंत. आमच्या कुटुंबाला सार्वजनिक रित्या दोषी धरलत.”
आमच बोलण चालू असताना तिथे ताटकळत उभे असलेले गांधी टोपी/लुगड घातलेले मराठी भाविक महाप्रसादासाठी गर्दी करू लागले. त्यांच्याकडे बोट दाखवत मी गुरुजींना म्हटलं – “आमचा विठुराया हा ह्या गांधी टोपी-काष्टीपातळवाल्या गोरगरीब मराठी माणसांचा देव आहे. मराठी आमची माय आहे. गुरुजी, तुम्ही आज केलत ते चुकीच केल.” अस त्यांना हात जोडून सांगून मी तिथून निघालो.
मराठी मधून पूजा झाली नाही या पेक्षा माझ्या सोबतच्या जवळपास ३०-३५ मराठी कुटुंबांनी बघ्याची भूमिका घेतली याच मात्र जाम वाईट वाटलं. आपण ज्या लोकांसाठी भूमिका घेतोय त्या लोकाना त्या गोष्टीची काही पडलेली नाही हे मला जाणवल.
वैयक्तिकरित्या मात्र मी यापुढे ह्या हिंदी भाषेतल्या पूजेत भाग न घेण्याचं ठरवलं आहे. इथून पुढ फक्त विठुरायाच दर्शन घ्यायचं याचा निश्चय करून तिथून निघालो.