वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची धग अजून शांतही झाली नसताना, पुण्यात पुन्हा एकदा सासरच्या छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्नेहा विशाल झेंडगे असे मृत महिलेचे नाव असून, माहेरून 20 लाख घेऊन येण्याचा तगाद
.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहाचा विवाह गेल्या वर्षी विशाल झेंडगे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर ती पतीसोबत आंबेगाव पठार येथे राहत होती. परंतु, लग्नानंतरच्या काळात स्नेहा आणि सासरच्या मंडळींमध्ये वाद वाढले. पती, सासू, सासरे, दीर आणि नणंदीकडून तिच्यावर सतत शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप फिर्यादी व स्नेहाचे नातेवाईक यांनी केला आहे.
20 लाख रुपयांसाठी लावला तगादा
स्वयंपाक नीट करता येत नाही, माहेरून वीस लाख रुपये आणावेत, अशा कारणांवरून स्नेहाचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या सततच्या त्रासामुळे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे अखेर स्नेहाने आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडला आणि छळामुळे नैराश्यात गेलेल्या स्नेहाने अखेर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी कैलास मच्छिंद्र सावंत यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ या सात जणांविरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेने आंबेगाव पठार परिसरात हळहळ आणि संतापाची लाट पसरली आहे. केवळ वर्षभराच्या संसारानंतर अशा प्रकारे एका तरुणीचे आयुष्य संपल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत आणि सासरच्या छळाच्या घटनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.