Raj Thackeray: आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन दोन्ही भाऊ एकत्र आले. विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमात दोन्ही ठाकरेंना एकत्र पाहता आलंय. यावेळी एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असे विधान करत उद्धव ठाकरेंनी आपण युतीसाठी इच्छुक असल्याचे दाखवले आहे. पण राज ठाकरे केवळ मराठीच्या मुद्द्यावरच बोलले. यानंतर राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण अद्याप त्यांच्याकडून युतीसंदर्भात कोणतं विधान समोर आलं नाहीय. यावरुन चर्चांना उधाण आलाय. यावर राज ठाकरेंच्या पडत्या काळात सोबत असणारे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत ते बोलत होते
मोठा भाऊ-छोटा भाऊ?
युती म्हटलं की मोठा भाऊ, छोटा भाऊ हे आलंच. तुमच्या अशी चर्चा झालीय का? असा प्रश्न बाळा नांदगावकर यांना विचारण्यात आला. त्यावेळी बाळा नांदगावकर यांनी बोलताना जुनी आठवण सांगितली. 2017 ला पालिका निवडणुकीला आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. मोठा भाऊ तुम्ही, छोटे भाऊ आम्ही, असाच तो प्रस्ताव होता. पण त्यावेळी ऊंचावर होते. आम्ही खाली होते. आता त्यांना जाणिव झाली असावी, असे नांदगावकर म्हणाले. वेळ खूप बलवान आहे. ‘संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाहीत’असे विधानदेखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून आले होते. यावर निवडणुकीवेळी अशी विधाने येत असतात. त्याचे वाईट वाटून घ्यायचे नसते. आम्हीदेखील निवडणूक काळात अशी विधान करतो, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
युतीबाबबत राज ठाकरे फारसं बोलताना दिसत का नाहीत?
युतीबाबबत राज ठाकरे फारसं बोलताना दिसत का नाहीत? या प्रश्नाचे उत्तर देताना राज ठाकरेंचा स्वभाव पहिल्यापासून तसाच आहे. आम्ही शंभर पाऊलं पुढे असू तर ते 10 हजार पाऊले पुढे असतात. एवढे कॉम्बिनेशन त्यांच्या चारही बाजून असतात. ते ऐकून आम्ही थक्क होतो, असे उत्तर बाळा नांदगावकरांनी दिलं. मनसे इंडिया आघाडीचा घटक असेल का? हे मी आज सांगू शकत नाही. मराठी आणि हिंदुत्व ही आमची विचारधारा आहे. राज ठाकरे हे सोडून काही करतील अस मला वाटत नाही. पण अनेकदा या पलिकडे जाऊन राजकारणात गोष्टी होतात. त्यामुळे आताच काही सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले.
‘मतांच्या गणितासाठी’
मारहाण करुन भाषा लादू शकत नाही. तुम्ही शब्दफेक कशी करता यावर सर्व अवलंबून आहे. तुम्ही एकदम त्वेशाने, द्वेशाने बोलता तेव्हा तरुण रागवतात. हिंदी द्वेशाचा विषय नाही. कुठेतरी आपल्या भाषेचा सन्मान राहिलाच पाहिजे. त्यांच्यावर लादता कामा नये. त्यांनी ते स्वीकारले पाहिजे. मुंबईत येऊन मराठी शिकत नाही. मतांच्या गणितासाठी राजकारणी हा विचार करत नाहीत, ही खंत त्यांनी बोलून दाखवली.
‘भूतदया आपापल्या घरी’
आताचे सत्ताधारी, विरोधक यांनी विचार करायला हवं. आपली बंधन इतर धर्मावर लादायची नाही. पण आपल्या धर्मामुळे इतरांमुळे त्रास होऊ नये. कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय. माणस जगवायची की कबुतर? माणसं जगली तर कबुतराला दाणा घालतील. भूत दया करायचीय त्यांनी त्यांच्या घरात करावी, असे ते म्हणाले. मराठीची ताकद कमी झालीय यावर सर्व पक्षातील राजकारण्यांनी एकत्र यायला हवं. मराठी माणसाची विखुरलेली ताकद यामुळेच मराठींना घर, नोकरी देणार नाही, असे बोलण्याची हिंमत होते. मराठींनी जाग राहिलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.