धामणगाव रेल्वे परिसरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमधील चोरांच्या शोधात असलेल्या गुन्हे शाखेने वर्धा जिल्ह्यातील एका अट्टल दुचाकी चोराला अटक केली आहे. आकाश पुरुषोत्तम चव्हाण (वय ३०, रा. बोरखेडी) असे आरोपीचे नाव असून शहरातून दोन वर्षांपूर्वी चोरीला
.
शहरात ०७ डिसेंबर २०२३ रोजी नवीन रामदासजी धोटे (वय ३० वर्ष रा. रामदेवबाबा नगर, धामणगांव रेल्वे) यांची बजाज पल्सर क्र. एमएच २७ सी.क्यु. ८२१४ घरासमोर उभी होती. अज्ञात चोरट्याने ती लंपास केली. त्यामुळे मागील दीड वर्षात सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील दुचाकी चोरी करणारा आरोपी आकाश चव्हाण रा. बोरखेडी ता. सेलू,जिल्हा वर्धा हा असून तो सध्या सदर गुन्ह्यातील दुचाकी पल्सर विक्रीकरिता चांदूर रेल्वे परिसरात फिरत होता. ही माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यांनी आरोपीचा शोध घेतला असता आकाश चव्हाण हा त्याच परिसरात बजाज पल्सर दुचाकीसह मिळाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सदर दुचाकी क्रमांक एम एच २७ सी.क्यु. ८२१४ (किंमत अंदाजे ५० हजार रुपये) जप्त करण्यात आली.
या कारवाईनंतर आरोपी आकाश चव्हाण व जप्त मोटारसायकल पुढील योग्य कार्यवाहीस दत्तापूर पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक मोहंमद तसलीम, मुलचंद भांबुरकर, अमंलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, सागर धापड, विकास अंजीकर, चालक हर्षद घुसे यांनी केली.