राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत धक्कादायक दावा करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
.
काँग्रेस नेते राहुल गांधी सतत निवडणूक आयोगावर आरोप करत असतानाच, शरद पवार यांनी नुकतेच म्हटले आहे की, “विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्ती मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी मला 288 पैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी दिली होती. मतांची फेरफार करण्याबाबत ते माझ्याशी बोलत होते.” आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांच्या आरोपांना दिले प्रत्युत्तर दिले आहे.
नेमके काय म्हणाले रावसाहेब दानवे?
रावसाहेब दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सहा महिने झाले आहेत, पण महाविकास आघाडीला तो अजूनही पचवता आलेला नाही. ईव्हीएम, मतदार यादी आणि मतदारांच्या वाढीबद्दल यापूर्वीही आरोप केले गेले होते, आणि आता हा चौथा आरोप आहे.
दानवे पुढे म्हणाले, “शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्यातील जनतेचा अपमान झाला आहे. हे आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन आहेत. त्यांनी ज्या दोन व्यक्तींचा उल्लेख केला आहे, त्यांची ओळख जाहीर करावी. आजकाल सर्वांच्या घरात कॅमेरे आहेत, त्यामुळे ते अधिकारी कोण आहेत, हे त्यांनी जनतेसमोर आणावे.”
हे अधिकारी नसून सर्वे एजन्सीचे लोक
रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “निवडणुकीच्या वेळी अनेक सर्वे एजन्सी येतात आणि आम्ही तुम्हाला इतक्या जागा जिंकून देतो, असे सांगतात. हे लोक उमेदवारांनाही भेटतात. त्यामुळे पवारांनी उल्लेख केलेले ते दोन लोक अधिकारी नसून सर्वे एजन्सीचे प्रतिनिधी असू शकतात. हे लोक आमच्याकडे लोकसभेला सुद्धा आले आणि विधानसभेला सुद्धा ते आले होते.”
दानवेंचे शरद पवारांना आव्हान
शरद पवारांनी जो काही आरोप केला तो बिनबुडाचा आहे. तथ्यहीन आहे, या राज्यातील जनतेचा अपमान करणारे हे आरोप आहेत, त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. हे सगळे अधिकारी नसून सर्वे एजन्सी वाले लोक आहेत. जर ते खरोखरच अधिकारी असतील आणि त्यामागे सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न असेल, तर पवारांनी त्यांचा खुलासा करावा, असे आव्हानही रावसाहेब दानवे यांनी शरद पवार यांना दिले आहे.