Ajit Pawar On Sayaji Shinde Birthday: ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सयाजी शिंदे यांचा 66 वा वाढदिवस पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांचं कौतुक करताना त्यांच्यासाठी खास गाणंही गायलं.
ट्री मॅन म्हणून ओळख असलेल्या सयाजी शिंदे यांच्या वृक्षारोपण मोहिमेचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपण दरवर्षी 25 कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला असून सत्ताकाळात 100 कोटी झाडं लावून ती जगवू. हे सातत्याने सुरू ठेवलं तर पुढील 20 वर्षात निसर्ग संवर्धनात आपण यशस्वी होऊ असं अजित पवार म्हणाले.
सयाजी शिंदेंसाठी अजितदादांनी गायलं गाणं
या कार्यक्रमात सागर कारंडे यांनी आईचं पत्र वाचताना सयाजी शिंदे यांचे डोळे पाणावले. अजित पवार यांनीही सयाजी शिंदे यांच्यातील ‘रांगडेपणा’ आणि स्पष्टवक्तेपणाचं कौतुक करत ‘गडी अंगाने उभानी आडवा…’ हे गाणं गाऊन कार्यक्रमातील वातावरण रंगवलं.
दरम्यान, एका सामाजिक कार्यकर्त्याने वृक्षतोडीबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर अजित पवार यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिल. त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला. कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो आणि मला उपदेश देतो असं अजित पवार हसत म्हणाले.
वॉचमन म्हणून केली नोकरी
सयाजी शिंदे यांचा जन्म 1959 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील साखरवाडी गावात झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1978 मध्ये मराठी नाटकांमधून केली. ज्यामध्ये ‘झुलवा’ या नाटकाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करताना हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली.
शिक्षणादरम्यान त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात वॉचमन म्हणून नोकरी केली. जिथे त्यांना मासिक 165 रुपये मिळायचे. नंतर बँकेत क्लार्क म्हणूनही काम केले. पण अभिनयाची आवड त्यांना मुंबईत घेऊन गेली. हिंदी चित्रपटात त्यांची ओळख रामगोपाल वर्माच्या ‘शूल’ या चित्रपटातील बच्चू यादव या खलनायकाच्या भूमिकेतून झाली. तमिळ चित्रपट ‘भरती’ मध्ये सुब्रमण्यम भारतींची भूमिका साकारून त्यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत यश मिळवले.