Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या घरी झालेल्या बैठकीत मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील सादरीकरण देण्यात आलं. या बैठकीला इंडिया आघाडीमधील सर्व प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली. मात्र उद्धव ठाकरेंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना रांगेत शेवटी बसवण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. भाजपानेही हा मुद्दा उचलून धरत उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे असताना ते पहिल्या रांगेत होते असा टोला लगावला आहे.
‘मला फार दु:ख झालं’
देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंना मागे बसवण्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, “आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे तर आमच्या आधीही ते राहिले. त्याच्यामुळे आता तिथे त्यांचा काय मान, सन्मान आहे हे तुमच्या लक्षात आलंच आहे. भाषणात दिल्लीसमोर मान झुकणार नाही, पायघड्या टाकणार नाही असं म्हणायचं. पण आता सत्तेत नसता दिल्लीत काय स्थिती आहे? हे पाहून थोडं दु:ख होतं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा अपमान? रांगेत शेवटी बसवल्याने चर्चांना उधाण
राहुल गांधींवर टीका करताना त्यांनी म्हटलं की, “अलीकडच्या काळात राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून एक स्क्रिप्ट लिहून घेतली आहे. अतिशय मनोरंजनात्मक ही स्क्रिप्ट सगळीकडे मांडत आहेत. पण यातून मनोरंजनाशिवय काहीच होणार नाही. एकही तथ्य त्यांनी मांडलेलं नाही. सगळ्या गोष्टी काल्पनिक मांडत आहेत. ते एकीकडे मतदारयादीत समस्या आहे म्हणतात, आम्हालाही मान्य आहे. इतकी वर्षं आम्ही हेच सांगत आहोत. आमची व्यापक सुधारणेची मागणी होती. आता निवडणूक आयोग त्यासाठी तयार असताना आणि बिहारमध्ये सुरु केलं तर त्यालाही विरोध करतात. मग नेमकं त्यांन काय हवं आहे? त्यांना केवळ आपल्या पराभवाचं कारण शोधून काढायचं आहे आणि त्यांनी ते काढलं आहे”.
बैठकीमध्ये नेमकं झालं काय?
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मतदार यादीतील कथित गैरव्यवहारावर यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीतील फोटो समोर आले असून, यामध्ये उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचं दिसत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही सहाव्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं.
या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा!#शेवटची_रांग pic.twitter.com/BuSuqAN6Qv
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 7, 2025
राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीत अनेक घोटाळे झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अनेक बेकायदेशीर गोष्टी झाल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर रात्री राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान राहुल गांधी यांनी मतदार घोटाळ्यावर प्रेजेंटेशन दिलं. त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शेवटच्या रांगेत बसले होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील एका पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री असतानाही त्यांना मागे कसं बसवू शकतो असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपाने पोस्टमधूनही डिवचलं
महाराष्ट्र भाजपानेही ठाकरेंना डिवचलं आहे. राहुल गांधींच्या भाषणादरम्यानचा एक स्क्रीनशॉट शेअर करत भाजपाने खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत अकाऊंटवरुन राहुल गांधी उपस्थित नेत्यांना संबोधित करत असताना ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचं दिसत आहे. फोटो शेअर करताना भाजपाने, “या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा!” असं म्हटलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘#शेवटची_रांग’ अशा हॅशटॅगही वापरला आहे.
FAQ
1) राहुल गांधी यांच्या घरी झालेल्या बैठकीत कोणते मुद्दे चर्चिले गेले?
दिल्लीतील राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि मतदार यादीतील कथित गैरव्यवहार यावर चर्चा झाली. राहुल गांधी यांनी मतदार यादीतील घोटाळ्यांबाबत पुराव्यांसह सादरीकरण केले.
2) उद्धव ठाकरे यांना बैठकीत शेवटच्या रांगेत का बसवले गेले?
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत (सहाव्या रांगेत) स्थान देण्यात आले. याबाबत स्पष्ट कारण समोर आलेले नाही, परंतु असे मानले जाते की उद्धव ठाकरे उशिरा पोहोचल्याने त्यांना मागे बसावे लागले असावे. यावरून भाजपाने टीका करत ठाकरेंचा स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित केला.
3) भाजपाने उद्धव ठाकरेंवर कशी टीका केली?
महाराष्ट्र भाजपाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसलेले दाखवून, “या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा! #शेवटची_रांग” अशी खोचक टीका केली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “आमच्याकडे उद्धव ठाकरे नेहमी पहिल्या रांगेत होते, पण आता दिल्लीत त्यांचा सन्मान काय आहे हे दिसून आले,” असा टोला लगावला.