साहेब, डीपीसाठी पैसे दिल्या शिवाय काम होत नाहीत, विजेचे खांब अद्यापही पडलेलेच आहेत, कामे कधी करणार, लोंबकळणाऱ्या तारा कधी दुरुस्त करणार? असा सवाल करीत ठाकरे गटाच्या पधिकाऱ्यांनी शुक्रवारी ता. ८ दुपारी विज कंपनीच्या कार्यालयात थाली बजावो अांदोलन करून
.
हिंगोली जिल्ह्यात विज कंपनीच्या कामाचा बोजवारा उडाला असून शेतीपंपासाठी योग्य दाबाने विज पुरवठा राहात नाहीत. एवढेच नव्हे तर डीपी नादुरुस्त झाल्यास दुसरा डीपी देण्यासाठी पैसे मागितले जातात. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब अद्यापही पडलेले असून विज वाहिन्या लोंबकळत असल्यामुळे अपघाताची शक्यता झाली आहे. विज वाहिनीचा धक्का लागल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यानंतरही विज कंपनीकडून कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
या प्रकारानंतर आज दुपारी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख, परमेश्वर मांडगे, वसीम देशमुख, औंढा नागनाथ तालुका प्रमुख संदेश देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उध्दवराव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विज कंपनीचे कार्यालय गाठले. यावेळी विज कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांना धारेवर धरले. पदाधिकाऱ्यांनी गावपातळीवर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा पाढाच वाचला.
जिल्हयात शेतकरी व सर्व सामान्यांकडून तक्रारी केल्या जात असतांनाही त्याची दाखल का घेतली जात नाही असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला. शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची आर्थिक पिळवणुक करू नका, लोंबकळणाऱ्या विज वाहिन्या दुरुस्त करा अन्यथा यापेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी अधिक्षक अभियंता चव्हाण यांनी तातडीने प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.