महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी अशी दंगल घडवण्याचा खटाटोप सुरू आहे. भविष्यात अशी एखादी दंगल घडली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला सर्वस्वी जबाबदार असतील, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी राज्य सरकारला दिला. जरांगे यांच्य
.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबई चलोचा नारा दिला आहे. त्यानुसार जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांनी शुक्रवारी सातारा येथील फलटण येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी दंगल घडवण्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप केला. येत्या 29 ऑगस्ट रोजी आम्ही आरक्षणाचा तुकडा पाडणार आहोत. आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार हे निश्चित आहे. सरकार आरक्षण कसे देत नाही ते मी पाहतो. या प्रकरणी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसींची दंगल घडवण्याचा खटाटोप सुरू होता. पण आमच्यात असे काहीच होणार नाही. उलट दोन्ही समाज एकत्र येऊन फडणवीस यांना अद्दल घडवतील.
फडणवीस ओबीसींसाठी लढणार, याचा अर्थ ते मराठ्यांविरोधात
मराठा आरक्षणाचा प्रश्न बाजूला ठेवून सर्व ओबीसी बांधवांना गोव्याला बोलावले जाते. तिथे त्यांचे मराठ्यांविरोधात कान भरले जातात. त्यामुळे भविष्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी दंगल घडली तर त्याला स्वतः देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. त्याचा फटका केंद्रातील मोदी सरकारलाही बसेल, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार केला आहे. हे बरे झाले. याचा अर्थ ते मराठ्यांसाठी लढणार नाहीत. त्यांना गोरगरीब मराठ्यांसाठी लढायचे नाही. यामुळे मराठ्यांची झोप उडेल. घटनात्मक पदावर बसेलला व्यक्ती ओबीसींसाठी लढण्याची भाषा करत असेल तर तो मराठ्यांसाठी लढणार नाही असा त्याचा अर्थ होतो. मराठ्यांनी आता जागे झाले पाहिजे.
फडणवीसांचा सर्वांना संपवण्याचा डाव
देवेंद्र फडणवीस हे भाजप संपवायला निघालेत. भाजपसाठी ही वागणूक घातक आहे. त्यासाठी मराठा नेत्यांची एक मोठी पॉवर अॅक्शन कमिटी स्थापन केली पाहिजे. कारण, फडणवीस हे सर्वांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले. जरांगे यांनी यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील लाखो लोक मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार असल्याचाही दावा केला. मुंबईतील मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने नागरीक सहभागी होणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील दौऱ्यात हजारो जण मला भेटण्यासाठी येत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनता मोठ्या ताकदीने मुंबईला येणार असेल, तर मराठवाडा व विदर्भातील मराठा समाजही तेवढ्याच ताकदीने मुंबईला येईल असा मला विश्वास आहे, असे जरांगे म्हणाले.