Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमधील (Uttarakhand News) उत्तरकाशी परिसरामध्ये असणाऱ्या धराली क्षेत्रात झालेल्या ढगफुटीनंतर येथील नदी-नाल्यांना पूर आला आणि पाहता पाहता डोंगरकड्यांना पायदळी तुडवत हे पाणी आणि चिखल गावांमध्ये शिरलं. चारधामपैकी एक असणाऱ्या गंगोत्रीनजीक असणाऱ्या या ठिकाणी पर्यटकांचीसुद्धा गर्दी असल्याची बाब समोर आली असून आता, या आणि यानजीकच्या प्रभाविक क्षेत्रात प्रत्यक्ष घटनेनंतर बचावकार्याला प्रचंड वेग आला आहे.
उत्तराखंडमध्ये पर्यटन आणि (Chardham Yatra) चारधाम यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रासह इतरही बहुतांश राज्यांच्या पर्यटकांची उपस्थिती असून, या राज्यात पावसाचं वाढतं प्रमाण आणि भूस्खलनाचा धोका पाहता नागरिकांना स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. घरालीतील भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळं सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या विविध भागांतील 151 पर्यटक तिथं अडकल्याची माहिती, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळाली आहे.
अधिकृत माहितीनुसार यामधील 26 जण मुंबई, ठाणे, वसईतील असून, सध्या यापैकी 120 जणांशी संपर्क झाला असून, ते आयटीबीपी कॅम्पमध्ये सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर, संपर्क होऊ न शकलेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी संपर्क साधत संबंधित मार्ग आणि उपाययोजनांवर चर्चा केली.
बचावकार्य आणि संपर्क साधण्यात का येतोय अडथळा?
उत्तराखंडमध्ये मागील कैक दिवसांपासून असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे मोबाइल नेटवर्कमध्ये बरेच अडथळे आणि संपर्क साधण्यात काही तांत्रिक बाबींमुळं अडचणी येत आहेत. तर बऱ्याच भागांमधील विजपुरवठा खंडित असल्या कारणानं आणि बॅटरी चार्जिंग नसल्यानं नागरिकांशी संपर्क होऊ शकत नाहीय. मात्र या सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याही हमी उत्तराखंड प्रशासनाकडून देण्यात आली आहे. इथं राज्यातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी महायुती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला गेले असून, पर्यटकांच्या मदतीसाठी राज्य शासनाच्या वतीनं मंत्रालयात एक नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आलं आहे.
अद्यापही 100 हून अधिक नागरिक बेपत्ता
उत्तरकाशीतील धरालीत मंगळवारी झालेल्या ढगफुटीनंतर भूस्खलान आणि पुरानंतर 400 हून अधिक नागरिकांपर्यंत मदरकार्य पोहोचलं असलं तरीही अद्यापही 100 हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे. हर्षिल भागातील लष्करी छावणीतून बेपत्ता झालेल्या एक अधिकारी आणि आठ जवानांचाही यात समावेश असून सध्या त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
#IndianAirForce assets were swiftly pressed into action following flash floods in Harsil-Dharali valley, Uttarakhand. Chinook and Mi-17V5 helicopters of #IAF, along with C-295 & AN-32 transport aircraft, evacuated 226 civilians, inducted 130 NDRF/SDRF/IA personnel, and… pic.twitter.com/xyTIpXntlM
— Indian Air Force (@IAF_MCC) August 8, 2025
पाण्यासोबत वाहत आलेल्या राडारोडा, चिखलानं घरांचं छत गाठल्यानं मोठाले दगड, मातीच सर्वत्र असल्यानं आता या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणं इथंवर आणण्याच्या हालचाली सरू झाल्या आहेत. उत्तराखंडमधील या बचावकार्यात अभियंत्यांपासून, लष्कर, वैद्यकीय कर्मचारी आणि अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असून, त्यांना श्वानपथकाचीसुद्धा साथ मिळत आहे.
FAQ
धरालीत काय घडलं?
धराली परिसरात ढगफुटीमुळे नदी-नाल्यांना पूर आला आणि पाणी व चिखल गावांमध्ये शिरून मोठं नुकसान झालं. गंगोत्रीच्या जवळ असलेल्या या भागात पर्यटकांचीही गर्दी होती.
महाराष्ट्रातील किती पर्यटक धरालीत अडकले आहेत?
सध्या महाराष्ट्रातील 151 पर्यटक धरालीत अडकले असून, यामध्ये 26 जण मुंबई, ठाणे, वसई येथील आहेत.
संपर्क साधण्यात अडथळे का येत आहेत?
ढगाळ वातावरणामुळे मोबाइल नेटवर्कमध्ये अडचणी, विजपुरवठा खंडित असणे आणि बॅटरी चार्जिंग नसणे यामुळे संपर्क साधता येत नाही.