Uddhav Thackeray Seat In Last Row Sanjay Raut Explained Why: ‘इंडिया’ आघाडीतील घटकपक्षांच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अपमानजनक वागणूक दिल्याचा सत्ताधारी पक्षांचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊतांनी खोडून काढला आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवर मंडळी पुढल्या रांगेतच बसली होती असं सांगताना अचानक ही मंडळी मागे बसायला का गेली हे संजय राऊतांनी सांगितलं.
बैठकीमधल्या फोटोंमध्ये नेमकं काय?
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मतदार यादीतील कथित गैरव्यवहारावर यासंदर्भातील चर्चेसाठी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांची बैठक गुरुवारी रात्री राहुल गांधींच्या घरी पार पडली. या बैठकीतील फोटो समोर आले असून, यामध्ये उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचं दिसत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही सहाव्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, कमल हसन यांना उद्धव ठाकरेंच्या पुढे स्थान देण्यात आलं होतं. कमल हसन यांच्याही मागे उद्धव ठाकरेंना बसवल्याने ते आता जास्त लाडके झाले आहेत का असा प्रश्न टीकाकारांनी उपस्थित केला.
राऊत काय म्हणाले?
विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या या टीकेबद्दल राऊत यांना पत्रकारांनी विचारलं असता ते चांगलेच संतापले. “हे भंपक लोक आहेत. आम्ही घरी गेलो होतो. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होतं. उद्धवजींना पुढे बसवलं. उद्धवजींचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर बसून नीट दिसत नाही. त्यामुळे आम्ही सगळेच पाठीमागे गेलो,” असं राऊत यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> राहुल गांधींच्या घरातील ‘तो’ फोटो BJP ने केला शेअर! कारण ठरले ठाकरे; भाजपा म्हणते, ‘या फोटोत…’
चित्रपटगृहांचा संदर्भही जोडला
राऊत यांनी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट बघतानाही मागील सीट निवडली जाते असा संदर्भही जोडला. “सिनेमा बघतो आपण तेव्हाही स्क्रीनजवळ बसलो की त्रास होतो, तसाच हा प्रकार! पहिल्या रांगेत बसल्यास त्रास होतो. स्क्रीनवरील गोष्टी कळत नाहीत, समजत नाहीत. म्हणून कमल हसन असतील किंवा इतरही सगळी मंडळी मागे गेलो. ती बसण्याची जागा नव्हती तर प्रेझेंटेशनसाठी बसलेलो ती जागा होती. भाजपाच्या मत चोरीविरोधात तिथे प्रेझेंटेशन सुरु होतं. काहीही बोलतात विरोध करायला,” असा टोला राऊतांनी लगावला.
“प्रमुख नेत्यांना पुढेच बसवलं होतं. उद्धव ठाकरे तांत्रिक बाबींमध्ये माहिर आहेत. त्यांनीच सगळ्यांना सांगितलं की इथून नीट दिसणार नाही. तेव्हा सगळे मागे आले,” असं संजय राऊतांनी सांगितलं.
इतर फोटो पाहिले नाहीत का ठाकरेंचे?
“भाजपा किंवा इतरांच्या आयटी सेलमधील लोकांना समजलं पाहिजे हे. अजूनही इतर फोटो तुम्ही पाहिले नाहीत का उद्धव ठाकरेंचे? उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकमेव कुटुंब आहे ज्यांना सोनियाजींनी राहुल गांधींचं नवं घर फिरवून दाखवलं. कसं घर बनवलं आहे वगैरे सांगितलं. बैठक संपल्यानंतरही ठाकरे कुटुंब अर्धा तास ते घरात होते,” असंही राऊत म्हणाले.
FAQ
1) ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्याचा दावा काय आहे?
सत्ताधारी पक्षांनी दावा केला की ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अपमानजनक वागणूक देण्यात आली, कारण त्यांना मागच्या रांगेत बसवले गेले. बैठकीतील फोटोंमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मागच्या रांगेत दिसत होते, तर कमल हसन यांना त्यांच्या पुढे स्थान देण्यात आले होते.
2) संजय राऊत यांनी या दाव्याला काय उत्तर दिले?
संजय राऊत यांनी हा दावा खोडून काढला आणि स्पष्ट केले की उद्धव ठाकरे आणि इतर नेते पुढच्या रांगेतच बसले होते. पण प्रेझेंटेशनच्या स्क्रीनवर नीट दिसत नसल्याने ते स्वतःहून मागच्या रांगेत गेले. राऊत यांनी याची तुलना चित्रपटगृहात मागच्या सीटवर बसण्याशी केली, जिथे स्क्रीन जवळून पाहिल्यास त्रास होतो.
3) बैठक का आयोजित करण्यात आली होती?
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आणि मतदार stयादीतील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांची ही बैठक राहुल गांधी यांच्या घरी आयोजित करण्यात आली होती.
4) बैठकीतील फोटोंबद्दल काय वाद निर्माण झाला?
फोटोंमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मागच्या रांगेत बसलेले दिसले, तर कमल हसन यांना पुढे स्थान मिळाले. यावरून टीकाकारांनी प्रश्न उपस्थित केला की उद्धव ठाकरेंना कमी महत्त्व दिले गेले का?