राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी चीनमधून आयात होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याच्या मुद्यावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. चीनच्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी
.
जयंत पाटील म्हणाले, चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात त्वरित थांबवण्यात यावी यासाठी काल माझ्या सांगली जिल्ह्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. खरंतर ही बाब मी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र त्यावर काहीच निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे सरकार या विषयावर गंभीर आहे की नाही असा प्रश्न आम्हाला पडतो आहे.
हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात मोठी घट झाली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात बेदाणा उत्पादन घटले आहे. त्यात चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. या दुहेरी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि परकीय गंगाजळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या दराचे गणित विस्कटले आहे.
ते पुढे म्हणाले, सांगली, नाशिक, जळगाव, सातारा अशा विविध भागांमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. हा द्राक्ष बागायतदार शेतकरी जगला पाहिजे या उद्देशाने त्यांनी पिकविलेल्या बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करुन द्राक्ष बागायतदार शेतकर्यांचे मजबुतीकरण करावे अशी मागणी आम्ही लावून धरतोय. एकिकडे अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत या सरकारने केलेली नाही. तर दुसरीकडे हे सरकार चीनमधील बेदाणा आयात करुन नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे.
शासनाची उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठली आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. सरकारने तात्काळ बेकायदेशीर आयात झालेल्या बेदाण्यांची विक्री थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अजित पवारांनीही केंद्राला लिहिले होते पत्र
उल्लेखनीय बाब म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहून चीनमधून होणारी निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांची आयात थांबवण्याची मागणी केली होती. चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची आयात होत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे व राष्ट्रीय महसुलाचे नुकसान होत आहे. त्यामुळे चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवावी. तसेच बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ पुणे यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे चीनमधील निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. तसेच त्यांना हा मुद्दा प्राधान्यक्रमाने सोडवण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान व केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयल यांना हे पत्र लिहिले होते.