Heavy Demand for Coconut : श्रावण महिन्याची सुरुवात आणि नारळी पौर्णिमेचे आगमन यामुळे सध्या बाजारात नारळाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. धार्मिक विधी, पूजा-अर्चा तसेच घरगुती वापरासाठी नारळ आवश्यक असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील तीन दिवसांमध्ये तब्बल 1600 टन नारळ विक्री झाल्याची नोंद झाली आहे.
होलसेल व किरकोळ बाजारात नारळाच्या दरातही मोठी वाढ झाली असून होलसेल दर 30 ते 35 रुपये आणि किरकोळ दर 40 ते 50 रुपये प्रति नारळ इतका पोहोचला आहे.
तीन दिवसांमध्ये विक्रमी आवक, कारण काय?
मुंबई बाजार समितीत सोमवारी 146 टन नारळाची आवक झाली होती. मंगळवारी एकाच दिवशी विक्रमी 922 टन तर बुधवारी 532 टन नारळ बाजारात आले. या तीन दिवसांत एकूण 1600 टन नारळांची विक्री झाली.
सध्या होलसेल मार्केटमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत दर 10 ते 15 रुपयांनी वाढले आहेत. एक महिनापूर्वी 20-30 रुपयांना मिळणारा नारळ आता 30-35 रुपयांना विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात याचे दर 40-50 रुपयांवर गेले आहेत.
हॉटेल व्यावसायिकांकडून मोठ्या नारळांची मागणी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश येथून नारळांची मोठ्या प्रमाणात आवक होते. बाजारात नारळांचा आकार पाहून दर ठरवले जातात. लहान व मध्यम आकाराचे नारळ हे धार्मिक कार्य किंवा घरगुती वापरासाठी घेतले जातात तर मोठ्या आकाराचे नारळ हॉटेल्ससाठी प्राधान्याने खरेदी केले जातात.
मुंबई व नवी मुंबईमधील हॉटेल व्यावसायिकांकडून मोठ्या आकाराच्या नारळांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. यामुळे त्यांचे दरही वाढले असून पूर्वी 35 रुपये असलेले दर आता 45 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
पुढील आठवड्यातही दर वाढण्याची शक्यता
व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार श्रावणात वाढती मागणी लक्षात घेता पुढील आठवड्यातही नारळाचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. विशेषतः नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा आणि श्रावणातील उपवास यामुळे मागणी अधिक तीव्र होईल असेही व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.