पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी ५ ऑगस्ट रोजी बँकॉकहून आलेल्या अतुल सुशील हिवाळे या प्रवाशाला अटक केली आहे.
.
हिवाळे याच्या ताब्यातून ६११९.१५ ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक वीड (गांजा) जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ६.१२ कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर हिवाळे याच्या चेक-इन ट्रॉली बॅगची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत लपवलेले अमली पदार्थ सापडले. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX-२४१ द्वारे तो बँकॉकहून पुण्यात आला होता.
या प्रकरणी एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीसाठी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अन्य एका प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) शिक्षा भोगून कारागृहातून सहा-सात महिन्यांपूर्वी बाहेर आलेल्या अनिल उर्फ अण्णा सुभाष राख (४६) याला पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून २६ किलो गांजा, मोटार, मोबाइल असा एकूण २१ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राख हा सराइत गुन्हेगार असून हडपसर भागातील खून प्रकरणात २०१४ मध्ये त्याच्याविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने गांजाची तस्करी सुरू केली होती.