नांदणी मठातील हत्ती महादेवी उर्फ माधुरी प्रकरणी माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंधळकर यांनी म्हटले की, राजू शेट्टी यांचा मोर्चा हा केवळ राजकीय स्टंट होता.
.
आंधळकर यांनी स्पष्ट केले की, न्यायालयीन प्रक्रियेने हा विषय मार्गी लावण्याऐवजी काही राजकीय नेते या मुद्यावर केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी जनभावना भडकवत आहेत. त्यांनी राजू शेट्टी यांची दुटप्पी भूमिका उजागर केली. पूर्वी एक भूमिका घेणे आणि आता राजकीय स्वार्थासाठी दुसरी भूमिका घेणे योग्य नाही.
आंधळकर यांनी सांगितले की, राजू शेट्टी यांनी एप्रिल 2018 मध्ये वनविभागाला पत्र लिहून हत्ती सांभाळण्याची व्यवस्था नसल्याचे मान्य केले होते. त्यांनी हत्तीचा ताबा घेण्याची विनंती केली होती. याच कारणामुळे पेटा सारख्या संघटनांनी लक्ष वेधून घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली.
आंधळकर यांनी पेटावर दोन कोटींचा आरोप करत अफवा पसरवणे ही जबाबदारीशून्य आणि दिशाभूल करणारी वागणूक असल्याचा आरोपही केला.
त्यांनी राजू शेट्टी यांच्या रविवारच्या मोर्चावरही टीका केली. त्यांनी म्हटले की, कलेक्टर कार्यालय बंद असतानाही तेथे मोर्चा नेण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. मोर्चात राजू शेट्टी यांच्या अंगावर माधुरीचा फोटो असलेला बनियन होता, परंतु इतर कार्यकर्त्यांकडे तो नव्हता. हे स्पष्टपणे दर्शवते की, हा मोर्चा केवळ राजकीय पुनर्वसनाचा स्टंट होता.
आंधळकर यांनी केंद्र व राज्य सरकारने हत्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करून हत्ती परत आणावी, अशी मागणीही केली आहे.