अमरावती येथे आमदार अर्जुन खोतकर यांनी एका राजकीय वादविवाद कार्यक्रमात खाटीक समाजाबद्दल केलेल्या असभ्य वक्तव्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ खाटीक समाजसेवा समितीने जिल्हाकचेरी परिसरात निदर्शने केली आहेत.
.
आमदार खोतकर यांनी केलेल्या वक्तव्यात त्यांनी बोकड आणि खाटीक यांचे उदाहरण देत, “बोकड खाटकाकडे गेल्यावर खाटीक त्याला चांगले खाद्य खाऊ घालतो. त्यामुळे बोकड खुश होतो. पण वेळ आल्यावर खाटीक त्याच बोकडाच्या गळ्यावर सुरा चालवतो. त्याच्यापासून सावध राहावे,” असे म्हटले होते.
या वक्तव्यामुळे खाटीक समाजाची प्रतिमा क्रूर व निर्दयी दाखविण्याचा अवमानकारक प्रकार घडल्याचे समितीचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण खाटीक समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
आमदार गजानन लवटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. समाजाच्या भावना दुखावणार्या व समाजाला हीन लेखणार्या या वक्तव्यामुळे आमदार खोतकर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विदर्भ खाटीक समाजसेवा समितीने इशारा दिला आहे की मागणी पूर्ण न झाल्यास त्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल.
निवेदन देताना आमदार गजानन लवटे यांच्यासोबत विदर्भ खाटीक समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुधीर लसनकर, भीमराव माकोडे, प्रा. रमेश खंडार, सुरेश वानखडे, श्रीराम नेहर, गोपाल हरणे, अविनाश हिरेकर, प्रा. लक्ष्मण कराळे, दीपक घन, गणेश नेहर, विश्वेश्वर विरुळकर, देवराव कुर्हेकर, संजय शेंडे, प्रतीक लसनकर, श्रीकांत विल्हेकर, संदीप काठोळे, नानाभाऊ धर्माळे, विनायक लवटे, प्रल्हाद कंटाळे, विठ्ठल मदने, किशोर दुर्गे, सुनील कुर्हेकर आदी समाज बांधव उपस्थित होते.