महाराष्ट्राचे 34 पर्यटक उत्तराखंडमध्ये बेपत्ता?: आंबेगावच्या 19, धरणगावच्या 15 पर्यटकांचा समावेश; धराली ढगफुटीनंतर संपर्क तुटला – Mumbai News



उत्तराखंडच्या धराली येथील ढगफुटीनंतर महाराष्ट्रातील तब्बल 34 पर्यटकांशी संपर्क होत नसल्याची बाब पुढे आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील 19 व जळगावच्या धरणगाव तालुक्यातील 15 पर्यटकांचा समावेश आहे. प्रशासनातर्फे सध्या या पर्यटकांशी संपर्क साधण्याचा युद्ध पा

.

उत्तराखंडच्या धराली गावात मंगळवारी भयंकर ढगफुटी झाली होती. त्यानंतर नदीला आलेल्या पुरात अख्खे गावच भूईसपाट झाले होते. या घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 50 हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, जळगाव, नांदेड आदी जिल्ह्यांतील अनेक पर्यटक उत्तराखंडच्या पर्यटनासाठी गेले होते. यापैकी 34 पर्यटकांशी संपर्क होत नसल्यामुळे काळजी वाढली आहे.

अवसरीच्या 19 जणांचा शोध सुरू

यासंबंधीच्या वृत्तानुसार, आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 1990 च्या 10 वीच्या बॅचमधील 8 पुरुष व 11 महिलांचा एक समूह पर्यटनासाठी 1 ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा गंगोत्री परिसरातून शेवटचा संपर्क झाला होता. काल सकाळी या समुहातील काही जणांनी गंगोत्री येथील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मंगळवारी दुपारी धराली येथे ढगफुटी झाली तेव्हा हा समूह त्याच भागात होता. या समुहातील एका महिलेने आपल्या मुलाशी फोन करून आपण सर्वजण सुखरूप असल्याचे कळवले होते. पण त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही.

धरणगावच्या 15 भाविकांशी संपर्क तुटला

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील 15 भाविकांचा एक समूह उत्तराखंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यांचे नातलग कालपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती आहे.

सोलापूरचे 4 तरुण बेपत्ता

दुसरीकडे, सोलापूरचे 4 तरुणही गंगोत्री परिसरात अडकलेत. त्यांच्याशीही संपर्क करण्यात अडथळे येत आहेत. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी थोटे अशी या तरुणांची नावे आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी आपण गंगोत्री परिसरात असल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या चौघांची माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनासाठी संपर्क साधला. एनडीआरएफने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सोलापूरच्या एकाही व्यक्तीचा समावेश नाही. त्यामुळे या तरुणांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे.

नांदेडचे 11 पर्यटक सुरक्षित

दरम्यान, नांदेडचे 11 पर्यटक उत्तरकाशी येथील खराडी गावात सुरक्षित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्क कार्यालयाने या पर्यटकांशी संपर्क साधला. नांदेड जिल्हा प्रशासनही त्यांच्या संपर्कात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24