नांदगाव खंडेश्वर येथील शिवाजी महाविद्यालयाला विज्ञान शाखेकरिता अकरावीसाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढवून देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालक कार्यालयात शेकडो विद्यार्थ्यांनी धडक देऊन निवेदन
.
शासनाने प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली आहे. ऑनलाइन प्रक्रियेच्या इंटेक पोर्टलवर अनुदानित व विनाअनुदानित तुकडीला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असल्याने १०० हून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. एक महिन्यापासून विद्यार्थी महाविद्यालयात चकरा मारत आहे. त्यामुळे मंगळवारी नांदगाव खंडेश्वर येथील विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात धडक देऊन निवेदन सादर केले. त्यावर शिक्षण उपसंचालकांनी शासनाची परवानगी घेऊन दोन दिवसांत प्रवेश क्षमता वाढवून दिली जाईल, असे सांगितले असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. या वेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर, शुभम रावेकर, अक्षय हिवराळे, अमन मानकर, प्रेम हिवराळेसह पीयूष निमणेकर, रोहित वानखडे, सानवी देशमुख, आयुष धानोरकर, हिमांशू राजगुरे, दिव्या चव्हाण, शिवानी अलोणे, धनश्री ढोमणे, संस्कृती काळे, जयश्री पवार, दुर्गा सोनकुवर, रिया हूड, प्रियांका जाधव, तन्वी बागोकर आदी विद्यार्थी उपस्थित होते.
तीव्र आंदोलनाचा इशारा शहरातील कॉलेजला इयत्ता अकरावीसाठी विद्यार्थी मिळत नसल्यामुळे मंत्री, आमदार, खासदार यांचे कॉलेजेस बंद पडण्याच्या मार्गावर असल्यानेच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, असा आरोप करत दोन दिवसांत वाढीव प्रवेशाला मान्यता द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी दिला आहे.