पुणे पोलिस आयुक्तालयात मंगळवारी पुण्यातील गणेश मंडळांच्या दोन स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. सुरुवातीला प्रमुख गणेश मंडळांची बैठक झाली. त्यानंतर मानाच्या गणपतींच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली.
.
बैठकीत गणेश मंडळांच्या सूचना, समस्या आणि गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत चर्चा झाली. मानाच्या गणपतींपूर्वी अनेक गणेश मंडळांनी मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची इच्छा दर्शवल्याने काही वाद निर्माण झाला आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठकीनंतर सांगितले की त्यांनी दोन्ही बैठकांमध्ये मंडळांच्या मागण्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की कुठल्याही गणेश मंडळांमध्ये आपापसात मतभेद नाहीत.
आयुक्त म्हणाले, “सर्व गणेश मंडळे आपापसात बैठक घेऊन योग्य निर्णयावर पोहोचतील. गणेशोत्सव चांगल्या वातावरणात शांती आणि सुव्यवस्थेत पार पडेल. गणेश विसर्जन मिरवणुका सुरळीत होतील.”
गणेश मंडळांनी पोलिसांकडे अनेक मागण्या केल्या आहेत. मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होण्यापूर्वी इतर रस्त्यांवरून मार्गस्थ होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. बेलबाग चौक ते नाना पेठ रस्ता गणेशोत्सव दरम्यान सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
मिरवणुकीत एक मंडळ एक ढोलताशा पथक करावे अशी सूचनाही गणेश मंडळांनी पोलिसांना केली. मानाची पाच गणपतींची मिरवणूक दुपारी १२ पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी, जेणेकरून इतर मंडळांवरचा ताण कमी होईल अशी भूमिकाही मांडण्यात आली.
टिळक रोडवर गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी आठ पासून सुरू करण्याचा निर्णय जवळपास सर्व संबंधित गणेश मंडळांनी निश्चित केला आहे.
मानाच्या गणपती मंडळांनी इतर गणेश मंडळांच्या मागण्यांबाबत चार दिवसांनंतर एकत्रित बसून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.