अमरावती येथे प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ९६ तासांच्या विश्वविक्रमी गायनाचा उपक्रम सुरू आहे. रंगोली पर्ल येथे ४ ऑगस्टला दुपारी ४ वाजता या उपक्रमाला सुरुवात झाली. हा सलग गायनाचा कार्यक्रम ८ ऑगस्टला दुपारी ४ वाजता संपन्न होणार
.
श्री छत्रपती बहुउद्देशीय व क्रीडा विकास संस्था आणि सुरसंगीत कराओके क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा विश्वविक्रमी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गायक प्रभुदास भंदे व पवन फंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह या विश्वविक्रमाचे आव्हान स्वीकारले आहे. या विक्रमाच्या प्रमाणीकरणासाठी नागपूरचे मनीष पाटील ज्युरी सदस्य म्हणून उपस्थित आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिवंगत राज्यपाल रा.सू. गवई यांच्या पत्नी आचार्य कमलाताई गवई, डॉ. गोविंद कासट, प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुरसंगीत कराओके क्लबचे संस्थापक प्रभुदास फंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात संगीताचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की संगीत हे माणसाला प्रचंड दिलासा देते. कितीही ताण असला तरी माणूस संगीतात रमतो. संगीताच्या माध्यमातून तणाव दूर होतो.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर किशोर कुमार यांच्या ‘आती रहेगी बहारे’ या गाण्याने कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ‘के पग घुंगरू’ या गाण्यानंतर कार्यक्रमात चांगलीच रंगत आली.
या विश्वविक्रमासाठी केवळ अमरावती शहरातूनच नव्हे तर बाहेरगावातूनही अनेक कलाकारांनी सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाच्या समारोपाला सुनील बुधवानी, राजेंद्र ठाकरे, विजय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन पराग अंबाडकर, बबलू ठाकूर, सौरभ पाचडे यांच्यासह अनेकांनी केले आहे.