नांदगाव पेठ परिसरातील माहुली जहांगीर येथे सोयाबीन पिकावर हुमणी अळीने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे सुमारे ७० टक्के पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे बहरलेले पीक उध्वस्त झाले आहे.
.
हुमणी अळीने पिकाची पाने, कोवळ्या शेंगा आणि रोपे जलद गतीने खाऊन टाकली आहेत. परिणामी काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. मात्र आता पेरणीची योग्य वेळ निघून गेल्याने दुबार पेरणी करणेही शक्य नाही.
माहुली जहागीर येथील शेतकरी पंजाबराव यावले यांच्या तीन एकर क्षेत्रातील उत्तम स्थितीत असलेल्या पिकावर अचानक हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढला. सध्या पिकाची वाढ निर्णायक टप्प्यावर असताना हा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कृषी सहाय्यकांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, प्रादुर्भावाची तीव्रता पाहता येत्या काही दिवसांत पिकाचे शंभर टक्के नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना हुमणी अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी व अन्य उपाय तात्काळ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.