सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपद भुषवणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची तयारी, NCP च्या गोटात चाललंय काय?


NCP Camp Preparations: अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. हसन मुश्रीफांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत एक विधान केलं आहे. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांनी मुश्रीफांसह देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय. तर शिंदेंच्या शिवसेनेनं देखील दादांच्या राष्ट्रवादीची फिरकी घेतलीय.

‘अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत शांत बसायचं नाही’ 

एक नव्हे, दोन नव्हे चक्क सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपद भुषवणा-या अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तयारीला लागले आहेत. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत शांत बसायचं नाही असं आवाहन हसन मुश्रीफांनी राष्ट्रवादीचे नेते,पदाधिका-यांना केलंय. 

‘फडणवीसांचा पत्ता कट करायचा आहे का?’

हसन मुश्रीफांच्या या विधानानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी मुश्रीफांना टोला लगावला आहे. मुश्रीफांना देवेंद्र फडणवीसांचा पत्ता कट करायचा आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत? 

हसन मुश्रीफांच्या विधानानंतर मंत्री भरत गोगावलेंनी थेट संजय राऊतांच्या वक्तव्यांना दुजोरा दिलाय. महायुती सरकारचे निर्णय दिल्लीत मोदी-शाह घेत असतात असा आरोप राऊतांनी अनेकदा केलाय. तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा दिल्लीत होत असतो त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य, असं विधान दादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर गोगावलेंनी केलंय. तर राऊतांनी देखील अप्रत्यक्षरित्या भाजपला खोचक टोला लगावला आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी संख्याबळ लागतं?

शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी देखील मुश्रीफांच्या विधानावर प्रतिक्रिया दिलीय. मुख्यमंत्रिपदासाठी संख्याबळ लागतं? असं म्हणत शायना एनसी यांनी दादांच्या राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना उधाण?

अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांची इच्छा आहे. वारंवार राष्ट्रवादीचे नेते आपली भावना व्यक्त करून दाखवतात. दरम्यान आज मुश्रीफांनी केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना उधाण आलंय.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24