पुण्यात मानाच्या 5 गणपतीनंतर कोणत्या बाप्पाचं विसर्जन? मिरवणुकीवरुन रंगलं मानापमान नाट्य!


चंद्रकांत फुंदे, झी 24 तास पुणे: पुण्याच्या गणेशोत्सवात खरंतर विसर्जन मिरवणूक हेच सर्वासाठी खास आकर्षण असतं.पण यंदा  त्यावरूनच मानापमान नाट्य बघायला मिळतंय.मानाचे 5 गणपती हे पूर्वापार निश्चित असले तरी यंदा प्रथमच 6 व्या क्रमांकावरून चढाओढ बघायला मिळतेय.याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

6 व्या क्रमांकावर कोण जाणार?

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या पुणे सार्वजनिक गणेशोत्सवाला खरंतर शेकडोवर्षांची परंपरा आहे. पण कालानुरूप त्यात अनेक बदल होऊन अलिकडच्या काळात गणेश मंडळांकडून दरवर्षी केली आकर्षक आरास आणि 10 व्या दिवशीची विसर्जन मिरवणूक हेच दोन प्रमुख आकर्षणं गणेश भक्तांचे पाय पुण्याकडे खेचतात. गणेश विसर्जन मिरवणुकीत परंपरेनुसार पहिली पाच गणपती मंडळं ही ठरलेली असतात. यंदाही त्याबद्दल कोणाचाच वाद नाही पण 6 व्या क्रमांकावर कोण जाणार? हा वाद माञ, यंदा प्रथमच निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय.भाऊ रंगारी ट्रस्टने यंदा 6 व्या क्रमांकावर दावा ठोकलाय.

कोणी घेतली टोकाची भूमिका?

दरम्यान, आजवरच्या परंपरेनुसार 6,7व्या क्रमांकावर जाणाऱ्या त्वष्टा कासार गणेश मंडळाने आपला नियोजित क्रम बदलण्यास ठाम नकार दिलाय. मानाच्या गणपतीनंतर पालिका कर्मचारी गणपती पाठोपाठ जाणार तर आम्हीच नाहीतर मिरवणुकीतच सहभागी होणार नाही, अशी टोकाची भूमिका मंडळाचे अध्यक्ष छोटू वडके यांनी घेतलीय.

दरम्यान तिकडे, दगडूशेठ हा 4 वाजता बेलबाग चौकात येण्याचा गेल्या 2 वर्षांपासूनचा शिरस्ता यावेळी कायम राहणार असल्याचं जाहिर केलंय. त्यामुळे मिरवणुकीत भाऊ रंगारी आणि मंडई आधी की दगडूशेठ आधी सहभागी होणार? हा नवाच पेचप्रसंग निर्माण झालाय. बघुयात आगामी बैठकीत तरी या दोन्ही वादावर काही सर्वमान्य तोडगा निघतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नेमका वाद काय आहे?

जगभरात आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून गणेश मंडळांमध्येच मतभेद असल्याचं समोर येत आहे. यंदा मानाच्या गणपतींआधीच शंभरहून अधिक मंडळाने एकत्रित येत निर्धार केला आहे. सकाळी सात वाजताच विसर्जनासाठी निघण्याचा निर्धार केला आहे. लक्ष्मी रस्त्यावरून सात वाजताच मिरवणूक सुरू करण्याच्या शंभर गणेश मंडळाच्या निर्णय झाला आहे.  दरवर्षी दहा वाजता मानाचे गणपतीची मिरवणूक निघते त्यानंतर इतर गणपती सहभागी होतात. वाद टाळण्यासाठी मानाचे मंडळाने सर्व  गणेश मंडळे समान आहेत. चर्चेतून प्रश्न सोडवण्याची भूमिकेत सर्वच मंडळं असल्याने पुढील काही दिवसांमध्ये यासंदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हा प्रश्न सुटणार कसा?

दुसऱ्याच दिवशी ग्रहण असल्याने, यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक लवकर सुरू होईल आणि लवकरच संपेल, अशी शक्यता आहे. गणेशोत्सव धार्मिक आणि श्रद्धेचा उत्सव आहे, त्यामुळे सर्वानी मिळून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले जात असून चर्चेतून या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वच मंडळं उत्सुक असल्याने हा वाद चर्चेनं सोडवणार आहे.

दोन मंडळांची नेमकी भूमिका काय?

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन आणि अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन काही दिवसांपूर्वी याच निर्णयाची माहिती दिली. सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, या वर्षीपासून मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि अखिल मंडई मंडळ या मंडळांनी घेतला आहे. ग्रहणाचा काळ सुरु होण्याआधी गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती मंदिरात नेणे आवश्यक आहे. याकरिता मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक असून, मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने घेतला आहे. याच प्रकारे सर्व गणेशमंडळांनी सहकार्य केल्यास पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असं या दोन्ही मंडळांनी म्हटलं आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24