Raju Shetty on Mahdevi Elephant: आम्ही जो लढा सुरु केला आहे तो आमचा हत्ती मिळेपर्यंत थांबणार नाही. तोपर्यंत रिलायन्स उद्योग आणि जिओवरील बहिष्कार कायम राहणार. याउलट आम्ही त्याची व्याप्ती वाढवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सांगत हात वर केले पण पुनर्विचार याचिकेत तुमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
“पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं कशाप्रकारे बनाव करुन सर्वच हत्ती वनताराकडे जाण्यासाठी प्रयत्न केले ते आम्ही कागदपत्रांसह दाखवून दिलं आहे. जर माधुरी शारिरीकदृष्ट्या फिट आहे यासंदर्भात वेगवेगळे 8 रिपोर्ट असताना, 48 तास प्रवास करुन तिथे पोहोचल्यानंतर अनफिट कशी झाली. तिला संधिवात, फ्रॅक्चर कसे झाले? याचं उत्तर शासनाने वनताराकडून घ्यावं अशी मागणी आम्ही केली आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीमधील हत्ती संगोपन केंद्र काही हत्ती वनातारात आहेत. ज्या पद्धतीने माधुरी हत्ती फिट आहे, हळूहळू सुधारत आहे त्याचे व्हिज्युअल्स वनताराने प्रकाशित केले आहेत. त्याच प्रकारे गडचिरोलीतून गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली, याचीही चित्रफित वनतारा प्रकाशित का करत नाही? 2023 साली विट्यातील एक हत्ती वनतारात गेला आहे, त्याचे व्हिडीओ, बातमी बाहेर का येत नाही असे अनेक प्रश्न आम्ही विचारले आहेत”.
“पेटा आणि वनतारा दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. खुद्द अजित पवारांनीदेखील माझ्या माहितीप्रमाणे वनतारात गेलेले तीन ते चार हत्ती हयात नाहीत असं सांगितलं आहे. याची माहिती घ्यावी लागेल. खोटा बनाव करुन, व्यवस्थेला वेठीस धरुन, प्रशासनाला वाकवून, न्यायव्यवस्थेची दिशाभूल करुन अशाप्रकारे महाराष्ट्रातील आणि सीमाभागातील जे हत्ती नेले जात आहेत त्याच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा मोडीत काढण्याचा उद्योग सुरु आहे. त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी माधुरी हत्तीणीच्या निमित्ताने मठाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली जावी आणि सरकार त्याच्यात सहभागी होईल असं सांगितलं आहे. सर्वसामान्यांची भावना शासनाच्या माध्यमातूनही मांडू आणि यदाकदाचित हे जे पाळीव हत्ती आहेत, त्यांच्यासाठी उपचाराची, संवर्धनाची जबाबदार सरकार घेईल. ही न्यायप्रविष्ट बाब असून, न्यायालयाकडे दाद मागत मठ आणि सरकार लढेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
दुर्दैवाने जनता रस्त्यावर आल्यावर सरकार जागं झालं आहे अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. खऱ्या अर्थानं प्राण्याचं छळ पेटा, वनतारा करत आहेत, आणि जे हत्तीला श्रद्धेने पाळतात, देव मानतात त्यांच्यावर विनाकारण आळ घेतला जात आहे असा आरोपही त्यांनी केला.
FAQ
1) महादेवी हत्तीण कोण आहे आणि ती का चर्चेत आहे?
महादेवी, जिला काही लोक ‘माधुरी’ म्हणतात, ही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात 1992 पासून वास्तव्यास असलेली 36 वर्षीय हत्तीण आहे. ती मठाचा आणि गावकऱ्यांचा अविभाज्य भाग होती. तिला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्याच्या न्यायालयीन निर्णयामुळे ती चर्चेत आहे, ज्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केला.
2) महादेवी हत्तीण गावातून का हलवण्यात आली?
पेटा (PETA) या प्राणी हक्क संघटनेने आरोप केला की, महादेवीचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर केला जात होता. यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२४ मध्ये तिच्या आरोग्य आणि कल्याणासाठी तिला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने २९ जुलै २०२५ रोजी ही याचिका फेटाळून तिच्या स्थलांतराला मान्यता दिली.
3) वनतारा काय आहे?
वनतारा हे गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स फाऊंडेशनद्वारे संचालित प्राणी संवर्धन केंद्र आहे. येथे प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन केले जाते. महादेवीला तिच्या आरोग्य आणि कल्याणासाठी या केंद्रात हलवण्यात आले, कारण ती साखळ्यांनी बांधलेली होती आणि तिच्या पायांना जखमा आणि मानसिक त्रास होता, असा दावा करण्यात आला.
4) महादेवीच्या आरोग्याबाबत कोणते मुद्दे उपस्थित झाले?
पेटाच्या तक्रारीनुसार, महादेवीला साखळ्यांनी बांधलं जात होतं, ती घाणेरड्या शेडमध्ये राहत होती, आणि तिच्या पायांना जखमा होत्या. १२ ऑगस्ट २०२३ रोजी स्थानिक पशुवैद्यकाच्या अहवालात ती मानसिक त्रासात असल्याचं आणि डोकं हलवत असल्याचं नमूद केलं. वनताराने सांगितलं की, तिच्या पायांची अवस्था हळूहळू सुधारत आहे आणि ती आता शांत आहे.