हिंगोली शहरात दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या नांदेडच्या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 5 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ॲटो, स्कूटी, खंजीर, मिरचीपूडसह 1.70 लाखा
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरासह जिल्हाभरात चोरी व दरोड्याचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 13 पोलिस ठाण्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके स्थापन झाली आहे. या पथकाकडून गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
दरम्यान, नांदेड येथून सहा जण एक ॲटो व स्कूटी घेऊन हिंगोली शहरात दरोड्याच्या उद्देशाने आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक माधव जिव्हारे, विक्रम विठुबोने, जमादार विकी कुंदनानी, आझम प्यारेवाले, सुभाष घुगे, मगरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, सतीष जाधव, स्वामी, लिंबाजी वाहुळे यांच्या पथकाने हिंगोली शहरालगत काही ठिकाणी छापे मारून पाहणी केली.
मात्र सहा संशयित रेल्वेपटरीजवळ थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून दोन्ही पथकांनी सोमवारी ता. 4 रात्री रेल्वे पटरी जवळ छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी नितीन उर्फ नकटा पप्पु वाघमारे, शेख जावेद, शेख खय्युब, अब्दुल सिराज, जावेदखान पठाण (रा. नांदेड) बबलु पठाण (रा. पुर्णा) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून त्याच्या जवळील ॲटो, स्कुटी, एक खंजर, मिरची पूड, दोरी, पक्कड असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक जिव्हारे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, उपनिरीक्षक राहुल महिपाळे पुढील तपास करीत आहेत.