Buldhana Accident: कावड यात्रेच्या मिरवणुकीत घुसली भरधाव मोटरसायकल, पुढे जे झालं ते फारच धक्कादायक…


Buldhana Accident: श्रावण मासातील दुसऱ्या सोमवारी भगवान शिवशंकराच्या भक्तीने न्हाऊन निघालेल्या कावड यात्रेवर दुखाचा डोंगर कोसळला. अजिंठा मार्गावरील पाडळी आणि पळसखेड दरम्यान भीषण अपघात झाला आणि भक्तांमध्ये चितेंचे वातावरण पसरले. मध्यरात्री 3 ते 3.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतेय. नेमकी कशी घडली घटना? सविस्तर जाणून घेऊया. 

नेमकी कशी घडली अपघाताची घटना ?

रविवारी सायंकाळी 7 वाजता गूळभेली येथून प्रथमच बुद्धनेश्वर येथे कावड यात्रानिघाली होती. या यात्रेत 40 हून अधिक तरुण सहभागी झाले होते. बुद्धनेश्वर येथे पोहोचल्यानंतर रात्री 12 वाजता शिवशंभूची आरती करण्यात आली. त्यानंतर श्रावण सोमवाराच्या पवित्र मुहूर्तावर कावडधारी परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, पळसखेड नागोच्या जवळ एक भरधाव मोटरसायकल (क्रमांक: MH 28 BZ 5274) कावड यात्रेच्या मिरवणुकीत घुसली आणि यात कावडधारी मुकेश गजानन राठोड (वय २५, रा. करवंड) यांना जोरदार धडक दिली.

अपघातात कितीजण जखमी?

या अपघातात मुकेश राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय, कावड यात्रेतील योगेश चव्हाण आणि आणखी एक कावडधारी गंभीर जखमी झाले. मोटरसायकलस्वार ऋषिकेश काकडे आणि मनोज माळोदे हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मुकेश राठोड यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

मृतक आणि जखमींचा तपशील

मृत मुकेश राठोड हे करवंड येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात दोन मुले आणि कुटुंब आहे. त्यांच्या अकाली निधनाने करवंड आणि गूळभेली गावांवर शोककळा पसरली आहे. जखमी झालेले मोटरसायकलस्वार ऋषिकेश काकडे आणि मनोज माळोदे हे बुलढाणा येथील रहिवासी आहेत.

स्थानिकांचा संताप आणि पोलीस कारवाई

हा अपघात इतका भीषण होता की, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. कावड यात्रा ही श्रावणातील पवित्र धार्मिक मिरवणूक असताना अशा प्रकारच्या बेजबाबदार वाहनचालकांमुळे अपघात घडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, मोटरसायकलस्वारांवर कारवाईसाठी तपास सुरू आहे.

ऐन श्रावणात शोककळा

श्रावणाच्या पवित्र वातावरणात भक्तीने न्हाऊन निघालेल्या या कावड यात्रेत घडलेल्या या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मुकेश राठोड यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून, गावकऱ्यांनी त्यांना आधार देण्यासाठी गर्दी केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24