Raj Thackeray: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी छोटे पक्ष राज ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता आहे.नुकतंच राज ठाकरेंनी शेकापच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं.आता प्रहारचे बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील छोटे पक्ष मनसेसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.राज ठाकरे सामान्य मराठी माणसात जेवढे लोकप्रिय आहेत. तेवढेच ते राजकीय वर्तुळातही लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता किती आमदार, किती खासदार, किती नगरसेवक या परिमाणांमध्ये बसत नाहीत. त्यामुळंच शेकापच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर दिसले. त्यावेळी त्यांनी लाल झेंड्याच्या व्यासपीठावर भगव्या विचारांचे नेते आल्याचा आवर्जून उल्लेख केला.
शेकापशी युतीसाठी सकारात्मक भूमिका?
राज ठाकरे शेकापच्या व्यासपीठावर गेले. त्यामुळं आगामी काळात राज ठाकरे शेकापशी युतीसाठी सकारात्मक भूमिका घेऊ शकतात अशी चर्चा रायगड परिसरात आहे. दुसरीकडं विदर्भातील आक्रमक नेते बच्चू कडूही राज ठाकरेंना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. बच्चू कडू संभाव्य़ युतीबाबत काहीही बोलले नसले तरीही मनसेनं प्रहारच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना भेटणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलंय.
राज ठाकरे युती करतील का?
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंकडं कोणतीही सत्ता नाही, पद नाही.. तरीही सत्ताधारी असो की विरोधक प्रत्येकाला राज ठाकरे आपल्यासोबत असावेत असं वाटू लागलंय. राज ठाकरे आता भाजपसोबत जाणार नाही असं विरोधी पक्षातील नेत्यांना वाटू लागलंय. राज ठाकरे काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेले नाहीतर शेकाप, प्रहारसारख्या छोट्या पक्षांशी त्या त्या जिल्ह्यात राज ठाकरे युती करतील का? याची उत्सुकता आता निर्माण झालीये.
‘महापालिकेत 100 टक्के सत्ता आपलीच’
आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेकडून मोटबांधणी सुरू करण्यात आलीय. राज ठाकरेंनी नेते, पदाधिका-यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देत निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. मुंबई महानगर पालिकेत आपलीत सत्ता येणार असल्याचा दावा देखील राज ठाकरेंनी केलाय. तसंच ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भातल्या युतीबाबत देखील राज ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, महापालिकेत 100 टक्के सत्ता
आपलीच येणार असं म्हटलंय. सुरुवातीला राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना प्रतिसाद दिला होता. मात्र, त्यानंतर राज ठाकरेंनी युतीबाबत थेट बोलणं टाळलं होतं.. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे युतीसंदर्भात कमालीचे सकारात्मक होते. उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीसाठी जाहीर भाष्य केलं होतं.. तर राज ठाकरेंकडून सावध पवित्रा घेण्यात आला होता. मात्र आता युतीबाबत योग्य वेळी बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय..
पालिकेवर झेंडा फडकवणार का?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीसाठी चांगलेच सकारात्मक दिसतायत, राज ठाकरेंनी आजच्या मेळाव्यातून त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.. तसंच युतीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांच देखील मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे मुबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही बंधू एकत्र येऊन राजकीय समीकरणं फिरवणार का? पालिकेवर आपला झेंडा फडकवणार का?, की महायुती वरचढ ठरणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.