राज्याच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने सोमवारी ता. ४ काळ्या फिती लाऊन निषेध केला आहे. जबाबदार मंत्री अशा प्रकारचे वक्तव्य करीत असेल तर त्याचा परिणाम कामावर होणार असल्या
.
परभणी येथे एका कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याबद्दल अपमानस्पद वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचे राज्यभरात तिव्र पडसाद उमटत असून राज्यातील सुमारे २२००० ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आज काळ्या फिती लाऊन कामकाज केले आहे.
हिंगोली येथे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे पाटील, सचिव राजेश किलचे, मच्छिंद्र गिरी, भुजंग भगत, गजानन राऊत, उत्तम आडे, सपना शिंदे, शुभांगी वाढोणकर, मिनाक्षी पंडीतकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फितीलाऊन काम केले. त्यानंतर गटविकास अधिकारी विष्णू भोजे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
राज्यात ग्रामपंचायत अधिकारी शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाची कामे उत्कृष्ठपणे केली जात आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कामामुळेच राज्याला घरकुल योजनेमध्ये केंद्राचा पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कामाचे फलीत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. मात्र राज्याच्या जबाबदार मंत्र्यांनी बोरी येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे संघटनेमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे लाभार्थ्यांच्या मनातही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबद्दल आस्था राहणार नाही त्याचा थेट कामकाजावर परिणाम होणार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या काळ्या फिती लाऊन जाहिर निषेध करीत असल्याचे नमुद करून ता. ७ ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मुकमोर्चा काढला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.