ऑगस्टची सुरुवात उकाड्यानं? राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांत मात्र मेघगर्जनेसह पावसाचा इशारा


Maharashtra Weather News : ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण सरासरीहून अधिक असेल असा इशारा आयएमडीनं दिला खरा. मात्र या महिन्याची सुरुवात मात्र तापमानवाढीनं झाली आहे. राज्याच्या कोकण, मुंबई शहर आणि उपनगरांसह इतर बहुतांश भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली असतानाच सूर्यकिरणं आणखी तीव्र होत असल्याचं पाहायला मिळालं. तर, कुठं श्रावणसरींनी हवामानातील गारवा कमी केला. मात्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा पट्टा यास अपवाद ठरत आहे. 

कोकण, मुंबईला हवामान विभागानं पावसाचा कोणताही इशारा दिलेला नसला तरीसुद्धा विदर्भातील पूर्वेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील दक्षिणेक़डे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात प्रामुख्यानं सोलापूर, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर, उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी आणि अंशत: ढगाळ वातावरण असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार सध्या अमृतसरपासून निघणारा मान्सूनचा आस असणारा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तर, अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत एक कमी दाबाचा पट्टासुद्धा सक्रिय असल्या कारणानं देशभरात मान्सून सक्रिय असला तरीही महाराष्ट्रात मात्र त्याचं प्रमाण असमान असल्याचं पाहायला मिळत आहे. 

कसं असेल देशातील पर्जन्यमान? 

IMD च्या अंदाजानुसारा देशभरात मान्सून सक्रिय झाला असून उत्तरेकडील राज्यांपासून ते अगदी दक्षिणेपर्यंत पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील बहुतांश नद्यांचा जलस्तर वाढला असून, त्यानं धोक्याची पातळी ओलांडल्यानं सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना यंत्रणांनी सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला आहे. तर, दक्षिण आणि पश्चिम भारतामध्येसुद्धा पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. 

दक्षिण भारतात प्रामुख्यानं लक्षद्वीप, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, तेलंगणा यातील बहुतांश भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढणार असून, ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असल्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याता इशारा देण्यात आला आहे. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24