चांदूर रेल्वे येथील विद्यार्थ्यांनी बसफेरी वेळेवर सुटावी या मागणीसाठी एसटी आगारात धडक दिली. राजुरा ग्रामपंचायत सदस्य तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक भूषण काळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात आला.
.
चांदूर रेल्वे आगारातून नियमित सुरू असणारी बस सेवा नियोजित वेळेवर सुटत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थी सकाळपासून शाळेसाठी घरून येतात. परंतु सायंकाळी ५.३० वाजताची चांदूर रेल्वे ते नांदगाव खंडेश्वर बसफेरी वेळेवर न सुटल्याने त्यांना घरी पोहोचायला रात्री उशीर होतो.
या समस्येला वाचा फोडण्यासाठी विद्यार्थी थेट आगार प्रमुखांच्या कार्यालयात गेले. त्यांनी बसफेऱ्या नियोजित वेळेवर सोडण्याची मागणी केली. या आंदोलनात राजुरा ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे, सामाजिक कार्यकर्ते सौरभ इंगळे यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते.
भूषण काळे यांनी सांगितले की, शाळा सुटल्यानंतर सायंकाळी घरी परत जाताना नियोजित वेळेवर बसफेरी न सुटल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना घरी पोहोचायला रोज उशीर होत असून या कारणामुळे पालकवर्ग चिंतेत आहेत. यामुळे अभ्यासावरही परिणाम होत आहे. त्यांनी आगार व्यवस्थापकांना त्वरीत याची दखल घेऊन बसफेरी नियोजित वेळेवर चालवण्याची मागणी केली आहे.