ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तर संजय शिरसाटांच्या विधानानंच शिवसेनेकडून समर्थन करण्यात आलं आहे. संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते. त्यांच्या कोणत्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.
शिंदेंच्या मंत्र्यांमागे लागलेल्या वादाचं मोहोळ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांना पुन्हा एकदा विरोधकांनी कोंडीत पडकलं आहे. अकोल्यात संजय शिरसाट यांनी केलेल्या एका विधानामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कामासाठी कितीही पैसा मागा, आपल्या बापाचं काय जातंय? सरकारचाच पैसा आहे असं विधान त्यांनी केलं आहे. मात्र, संजय शिरसाटांना माहिती नसावं सरकारचा पैसा हा जनतेचा पैसा असतो त्यांच्या बापाचं जात नाही, जनतेच्या बापाचं जात असं म्हणत अंबादास दानवेंनी शिरसाटांवर टीकास्त्र डागलं आहे.
जितेंद्र आव्हाडांनी देखील शिरसाटांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तर महायुतीचे मंत्री छगन भुजबळांनी मात्र, शिरसाटांच्या वक्तव्यानंतर शिंदेंकडे बोट दाखवलं आहे. त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यासंदर्भात विचारावं असं विधान भुजबळांनी केलं आहे.
संजय शिरसाटांच्या विधानानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर शिवसेनेनं मात्र, संजय शिरसाटांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. शिरसाट यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतल्याचं म्हणत शंभूराज देसाईंनी संजय शिरसाटांची पाठराखण केली आहे.
याआधीही संजय शिरसाट चांगलेच वादात सापडले होते. त्यांच्या घरातला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत शिरसाटांच्या बाजूला असलेल्या एका बॅगेत पैसे असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.
रिट्स हॉटेल खरेदी प्रकरण तसंच संभाजीनगर एमआयडीसी जमीनप्रकरणात देखील विरोधकांनी शिरसाटांवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान हे वादांचं सावट शिरसाटांच्या भोवती घोंगावत असतानाच पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहेत. शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.