Madhuri Elephant Kolhapur : 28 जुलैपासून कोल्हापूरकर दु:खात आकंठ बुडालेत. आपल्या लाडक्या माधुरीचा विरह त्यांना सहन होत नाहीय. नांदणी गावातल्या मठातल्या हत्तीणीला कुणी प्रेमानं ‘महादेवी’ म्हणतं तर कुणी ‘माधुरी’. 1992 पासून ती मठातच होती पण तिच्या संगोपनासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर तिला ‘वनतारा’त नेलं. त्यावेळी अनेकांनी तिला नेऊ नये, यासाठी अडथळा आणला पण यश आलं नाही. तेव्हापासून कोल्हापूरकर हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (Mahadevi and Madhuri elephant the same vantara nandani kolhapur temple jain math full story in marathi)
कोल्हापूरकरांनी याला विरोध का केला?
सकाळी पाचपासून कोल्हापुरातल्या नांदणीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीही सहभागी झाले होते. आबालवृद्ध सर्वच कोल्हापूरकर यात एकवटले होते. मागणी एकच आमची माधुरी परत करा. नुकतीच कोल्हापुरकरांनी महादेवी हत्तीणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात एक लाख 25 हजार 353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यासंदर्भात राष्ट्रपतींकडेही पाठपुरावा करणार, अशी भूमिका त्यांनी घेतलीय.
दरम्यान, महादेवी हत्तीणीबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी माणूस किंवा प्राणी हा प्रेमाचा भुकेला असतो, असं म्हणत त्यांनी पेटावर टीका केलीय. कोल्हापुरात तर आंदोलन होत आहेच पण आता सोलापुरातही महादेवी हत्तीणीसाठी आंदोलन केलं जातंय. एकूणच महादेवीशी कोल्हापुरकरांचं नातं किती दृढ आहे, याचीच प्रचिती यातून येतेय. वनताराचे सीईओ आपल्या पथकसह चर्चेला आलं होतं. आता कोल्हापूरकर राष्ट्रपतींकडे दाद मागणार आहेत. त्यांच्या लढ्याला यश येतं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
महादेवी हत्तीणी कोण आहे?
नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या 748 गावांचा केंद्रबिंदू मानला जातो. या मठाचा इतिहास शतकानुशतके जुना असून याच मठात गेल्या अनेक दशकांपासून परंपरेनुसार हत्ती पाळण्याची प्रथा आजही श्रद्धेने पाळली जाते. महादेवी ही त्या परंपरेची जीवंत प्रतिनिधी असून गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ती मठात राहत होती. मठाचे मठाधिपती प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी तिला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं, सांभाळलं. तिच्या शिस्तबद्ध वर्तनामुळे ती मठाची स्नेही म्हणून ओळखली जाऊ लागली होती. त्यामुळे तिच्या विहरात मठाधिपती ढसाढसा रडले.
महादेवीला वनतारा केंद्रात का हलवण्यात आलं? (Why was Mahadevi moved to Vantara Center?)
महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप ‘पेटा’ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली, त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे सोपवण्यात आली.
वनतारा काय आहे? (What is Vantara?)
दरम्यान वनतारा हे अंबानी समूहाचं गुजरातमधील खासगी प्राणी संवर्धन केंद्र आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपण प्राण्यांबद्दलच्या माणसांच्या प्रेमाच्या कथा पाहिल्या आहेत. ‘हाथी मेरे साथी’ पासून ते ‘टू जंगल्स’ पर्यंत, प्राण्यांशी माणसांचे भावनिक बंध दाखवले गेले आहेत. महादेवीची कथा यापेक्षा वेगळी नाही. ती गावकऱ्यांची लाडकी आहे, मठाची स्नेही आहे. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे त्या बंधाची साक्ष अख्खा महाराष्ट्राने पाहिलं.
नांदणीच्या गावकऱ्यांचा Jio वर बहिष्कार; कारण काय? (Nandni People Stop Using Jio)
नांदणीच्या गावकऱ्यांची एक फोन क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये अंबानी कुटुंबाने नांदणीच्या गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळेच गावकऱ्यांनी हा जिओचे सिम कार्ड न वापरण्याचा निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. आमच्या घरातील व्यक्ती गेल्यासारखे आम्हाला वाटत आहे,अंबानी कुटुंब आमच्या भावानांशी खेळले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जवळपास 7000 गावकऱ्यांनी जिओ कंपनीचे सिम कार्ड पोर्ट केले आहे.
महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरच्या नांदणी मठात परतणार का? (Will Mahadevi the elephant return to Kolhapur’s Nandani Math)
महादेवी हत्तीणीबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यामुळे त्याचं पालन वनविभागाकडून करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालते. तसंच महादेवी हत्तीणी नांदणी मठात राहील यासाठी मंगळवारी बैठक घेऊन त्यावर विचार करण्यात येणार असल्याचं फडणवीस म्हणालते. कायदेशीर तरतुदीवर बैठकीत विचार करून कारवाई करू असं त्यांनी म्हटलंय.
महादेवीचं भविष्य काय?
महादेवी आता वनतारा केंद्रात आहे. तिथे तिला उत्तम सुविधा मिळतील, असे सांगितलं जातं. पण सुविधा आणि प्रेम यात फरक आहे. नांदणीच्या मठात तिला मिळणारे प्रेम, तिची धार्मिक कार्यातील भूमिका, गावकऱ्यांचा लळा हे तिला वनतारा केंद्रात मिळेल का? हा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात कायम आहे. महादेवीची कथा ही केवळ एका हत्तीची कथा नाही, तर ती प्रेम, परंपरा आणि आधुनिक काळातील कटू वास्तवाची कथा आहे. ही कथा आपल्याला विचार करायला भाग पाडते की, प्राण्यांचे हक्क आणि माणसांच्या भावना यांचा समतोल कसा साधायचा? पैसा आणि सत्ता यांच्यापुढे भावनांचा पराभव होत राहणार का?