अमरावती-आष्टी मार्गावरील टाकरखेडा संभू परिसरात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मोठा अपघात टळला. एसटी बसचे ड्रायव्हर साइडचे मागील दोन्ही टायर निखळून जात होते. टाकरखेडा संभू येथील १८ वर्षीय प्रणव अजय काळे या तरुणाने ही बाब वेळीच लक्षात आणून दिल्याम
.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार टायरची कॉटर पिन निघाल्याने अचानक मागच्या बाजूचे टायर निखळून जात होते. ही बाब रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रणवच्या लक्षात आली. त्यावेळी तो आपल्या शेताकडे जात होता.
टायर निखळून जात असल्याचे पाहताच प्रणवने तातडीने चालकाला मोठ्याने आवाज दिला. आवाज न गेल्याने त्याने जवळच्या पाण्याच्या डबकीने गाडीच्या काचेला जोरात मारून बस थांबवली. त्यानंतर त्याने चालकाला टायर निखळून जात असल्याची माहिती दिली. प्रणवच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि ४५ प्रवाशांचे प्राण वाचले.
घटनेनंतर प्रवाशांनी प्रणवचे आभार मानले आणि कौतुक केले. काही महिला घाबरून पुढचा प्रवास थांबवून गावी परत गेल्या.
एसटीच्या देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधीही वलगाव, वायगाव, आष्टी मार्गांवर टायर निघण्याचे पाच ते सहा प्रकार घडले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे एसटी व्यवस्थापनाने या मुद्द्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.