MNS Party Attack Bar In Panvel: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पनवेलमधील शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील बार्सच्या संख्येबद्दल बोलताना चिंता व्यक्त केली होती. राज ठाकरेंनी हे विधान केल्यानंतर काही तासांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी खळ्-खट्याक करत पनवेलमधील बार फोडला आहे. राज ठाकरे यांच्या डान्स बारविरोधी वक्तव्यानंतर शनिवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील ‘नाईट रायडर्स’ बारवर हल्ला केला.
नेमकं घडलं काय?
‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर डान्स बार चालू देणार नाही!’ अशी घोषणा देत, रात्री मनसे समर्थकांनी बारची तोडफोड केली. पनवेलमधील ‘नाईट रायडर्स’ बारवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्ला चढवला. काल रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी या बारवर धडक देत बारवर दगडफेक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
पदाधिकाऱ्याची पोस्ट
मनसेचे नवी मुंबईमधील पदाधिकारी योगेश चिले यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन, ‘महाराजांच्या पावन भूमित आम्ही डान्सबार चालू देणार नाही. पनवेल मनसेने नाईट रायडर्स बार फोडला…’ अशी पोस्ट करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
“सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये? बंद झाले होते ना हो? अनधिकृतरित्या रायगड जिल्ह्यामध्ये एवढे डान्सबार, ते ही कोणाचे तर अमराठी लोकांचे. म्हणजे इथून पिळला गेलात की डान्सबारच्या नादी लागून तिकडून पिळून घ्यायचं,” असं म्हणत राज यांनी अप्रत्यक्षपणे डान्सबारपासून दूर राहण्याचं आवाहन केलेलं. “अहो हा रायगड जिल्हा आहे ना ओ? आमच्या शिव छत्रपतींची राजधानी आहे ना ओ येथे? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा नारळाने ओटी भरवून पाठवणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असतानाच त्या रायगडमध्ये डान्सबार सुरु आहेत,” असं म्हणत राज यांनी नाराजी व्यक्त केली होती.
स्थानिक तरुणांना राज ठाकरेंनी काय आवाहन केलं?
“रायगडमध्ये काय चालू आहे यावर लक्ष ठेवा, तुम्ही विकले जाताय, तुमच्या पायाखालची जमीन निसटतेय. तुमची भाषा पण निघून जाणार. कालांतराने पश्चातापाचा हात मारावा लागणार बाकी काही पर्याय राहणार नाही तुमच्याकडे. पैसा सगळ्यांना कमवायचाय. पैसा सगळ्यांकडे आला पाहिजे. तुमची कुटुंबं उभी राहिली पाहिजेत. मात्र महाराष्ट्र विकून नाही,” असं राज यांनी स्थानिक तरुण, तरुणींना आवाहन करताना नमूद केलं. आता मनसेची ही मोहिम अधिक तीव्र होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.