पुणे अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली भागातील एका भांड्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत अविनाश इंगळे (२१) आणि साहिल रोशन शेख (२०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघेही हडपसर येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी आरो
.
३१ जुलै रोजी मध्यरात्री आरोपींनी वाघोली भागातील स्टीलची भांडी विक्री करणाऱ्या दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील रोकड लांबवून ते पसार झाले. दुकान मालकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाण जवळील तसेच इतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेची पाहाणी सुरू केली.
सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांना आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा हडपसर भागातून चोरल्याचे आढळून आले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींनी प्रथम हडपसर भागातून रिक्षा चोरल्याची आणि नंतर वाघोलीतील दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून रोकड आणि चोरलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक आसाराम शेटे, उपनिरीक्षक मनोज बागल, सुवर्णा इंगळे आणि पोलीस कर्मचारी बाबासाहेब मोराळे, प्रवीण केदार, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.