राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ‘सनातनी दहशतवाद’ या विधानावरून राज्यात नवा राजकीय वाद पेटला आहे. भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी या मुद्द्यावरून आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान
.
राणेंची पोस्ट काय?
नीतेश राणे म्हणाले की, ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं.
केवळ हिंदुचा अपमान सुरू
नीतेश राणे म्हणाले की, खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे.
मतदारसंघासाठी महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका
नीतेश राणे म्हणाले की,‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या ‘बाटग्या’ विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका.