वसमत तालुक्यातील धामणगाव शिवारातील एका शेतात सात जनावरे कापून त्यांचे अवशेष घटनास्थळी फेकून दिले अन मांस पळवल्याचा प्रकार रविवारी ता. 3 सकाळी उघडकीस आला आहे. जनावरे तस्करी करतांना पोलिस व गोरक्षकांकडून अडवले जात असल्याने आता तस्करांनी नवा फंडा हाती घ
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील धामणगाव शिवारात मारोती खुळखुळे यांचे मुख्य रस्त्यालगत शेत आहे. नेहमी प्रमाणे खुळखुळे हे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेतात गवत आणण्यासाठी गेले होते. यावेळी शेतात पाऊल टाकताच त्यांना मोठ्या प्रमाणावर रक्त सांडलेले दिसले तर काही ठिकाणी जनावरांचे अवशेष दिसून आले. या प्रकारामुळे घाबरलेल्या खुळखुळे यांनी तातडीने कुरुंदा पोलिस ठाण्यात धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, उपनिरीक्षक प्रविण आगलावे, जमादार भगीरथ सवंडकर, प्रकाश भुरके यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी जनावरांच्या पोटातील अवशेष दिसून आले. तर एक ठिकाणी जनावराचे कान दिसून आले. पोलिसांनी घटना स्थळावरील रक्ताचे नमुने, अवशेषांचे नमुने घेऊन कुरुंदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना गाठला. त्या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी सविता थोरात यांनी अवशेषांची तपासणी केली असून सदर नमुने पुढील तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.
दरम्यान, जनावरांची तस्करी करतांना पोलिस व गोरक्षकांकडून वाहने अडवून कारवाई केली जात आहे. या शिवाय वाहनांमध्ये जनावरे ओरडत असल्यामुळे पकडल्या जाण्याची अधिक भिती असल्याने आता तस्करांनी हा नवा खेळ मांडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जनावरे कापून त्यांचे मांस घेऊन जायचे अन अवशेष फेकून द्यायचे असा प्रकार सुरु केल्याचे चित्र दिसून येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणात आता काही धोगेदोरे मिळतात काय याची पोलिसाकडून माहिती घेणे सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.