पीडित महिलेला मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा छळ: मारहाणीसह जातीवाचक शिवीगाळ केल्याचा पुणे पोलिसांवर आरोप, नेमके प्रकरण काय? – Pune News



पुण्यातील कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेण्यात आले, तसेच त्या महिलांवर पोलिस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण

.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिच्या मदतीला तत्काळ धाव घेत, पुण्यातील तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल केलं आणि स्वावलंबनासाठी आवश्यक अशा कौशल्यविकास प्रशिक्षणाचीही सोय केली. मात्र, या पीडित महिलेच्या नातेवाईकांमध्ये एकजण निवृत्त पोलिस अधिकारी असून, त्यांच्या दबावाखाली पुणे पोलिसांनी कोणतीही कायदेशीर नोटीस, समन्स किंवा वॉरंट न दाखवता कोथरूडमधील या तीन सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांना जबरदस्तीने पोलिस ठाण्यात नेले.

एपीआय आणि महिला कॉन्स्टेबलवर आरोप

या तिन्ही कार्यकर्त्या महिलांनी आरोप केला आहे की, कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये त्यांना एका वेगळ्या खोलीत नेऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक (API) प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलिस स्टेशनचे PSI अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.

अत्यंत खालच्या पातळीवरचे प्रश्न विचारले

यावेळी अत्यंत अपमानास्पद आणि जातीवाचक भाषा वापरण्यात आली. “तू महार-मांगाची आहेस म्हणून असे वागते का?”, “तू रांड आहेस”, “मुलांसोबत झोपतेस का?”, “तुम्ही सगळे LGBT आहात का?” असे अत्यंत खालच्या पातळीवरचे आणि अपमानास्पद प्रश्न विचारण्यात आल्याचे पीडित महिलांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे, तर त्यांना जवळपास पाच तास ‘रिमांड रूम’मध्ये ठेवण्यात आले. त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आणि पासवर्ड बदलण्यात आल्याचा दावाही या महिलांनी केला आहे.

या प्रकरणी पीडित महिलांनी म्हटले की, जर कोथरुडसारख्या सुसंस्कृत भागात पोलिसांकडून अशी वागणूक मिळत असेल, तर भविष्यात कोणीही पीडितांना मदत करण्यासाठी पुढे येणार नाही. ताकदवान लोकांच्या दबावाखाली पोलिस कसे बेकायदेशीर काम करतात, हे या घटनेतून स्पष्ट होतंय, असा आरोप त्यांनी केला आहे.

पोलिसांनी आरोप फेटाळले

दुसरीकडे, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, हे सगळे आरोप तथ्यहीन आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे एका महिलेची मिसिंगची तक्रार होती. त्या तपासात पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना सहकार्य केले. महिलांना कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ किंवा मारहाण करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळेंनी घेतली प्रकरणाची दखल

दरम्यान, महिलांसोबत घडलेल्या या प्रकाराची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. आणि त्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला ‘व्हॉट्सॲप’वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24