Gotya Gitte Video On Jitendra Awhad: वेगवेगळ्या गुन्ह्यांअंतर्गत फरार असलेला बीडमधील कुप्रसिद्ध आरोपी गोट्या गित्तेने शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे. धनंजय मुंडेंना बदनाम करू नका असं गित्तेने व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. रेल्वे रुळांवर बसून शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये आपण वाल्मीक अण्णा कराड यांचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं आहे. मात्र आपण त्यांच्यासोबत कशातही सहभागी नव्हतो असा दावा गित्तेनं केला आहे.
बिनबुडाचे आरोप करू नका
गोट्या गित्ते म्हणजेच ज्ञानोबा गित्तेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. “माझे कोणासोबत संबंध आहेत? वाल्मीक अण्णा कराडांसोबतचा मी एक कार्यकर्ता आहे. मी त्यांच्यासोबत काही केलेलं नाही. माझा काही संबंध नाही. जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, खासदार सोनवणे आणि दमानिया मॅडम हे बिनबुडाचे आरोप करतात,” असं गित्तेनं या व्हिडीओत म्हटलं आहे. “दमानिया मॅडम म्हणतात कुठल्यातरी मुलीला मी उचलून नेलं अरे गुन्हा कुठे दाखल आहे? ते दाखवा माझ्यावर. जितेंद्र आव्हाड हे तर वंजाऱ्याचे आहेत. मी वंजारी असून मला लाज वाटते त्यांची. हे तर म्हणतात मी देवाचा मुखवटा चोरला कुठलातरी. खंडणी, चोरी आणि वाल्मीक अण्णाचा राईट हॅण्ड आहे असे बिनबुडाचे आरोप करू नका,” असं गित्तेनं म्हटलंय.
माझ्यासमोर गोळ्या घालून मारलं
“जितेंद्र आव्हाड मला बदनाम करत आहेत ते वंजाऱ्याचे असूनही असं करत असल्याने मला वाटतं ते वंजारी नाहीच,” असंही गित्ते म्हणाला आहे. “बबन गित्तेने आम्हाला महादेव गित्तेच्या घरापाशी बोलावून घेतलं. पैसे आणलेत का नाही यावरून आमचं शिव्या देणं सुरू झालं. माझ्यासमोर त्याला गोळ्या घातल्या. मला दोन गोळ्या घातल्या. महादेव गित्तेने आणि बबन गित्तेने माझ्यासमोर गोळ्या घालून मारलं. त्याचं जितेंद्र आव्हाड काहीच बोलत नाही,” असंही गित्तेनं व्हिडीओत म्हटलं आहे.
त्यावेळेस उठाव का घेतला नाही तुम्ही?
“शरद पवार पक्षाचा तो प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष आहे त्याने गोळ्या घातल्या. त्यावेळेस उठाव का घेतला नाही तुम्ही? तो पण वंजाऱ्याचाच होता. संतोष देशमुखला न्याय भेटला पाहिजे त्यांच्या आरोपीला फाशीच झाली पाहिजे,” अशी मागणी गित्तेनं केली आहे.
पटरीवर पडून मरतो
“धनंजय मुंडे तिथे आले असं तुम्ही म्हणालात तुम्ही यायचं परळी तुम्हाला कोणी अडवलं होतं. धनंजय मुंडेंना टार्गेट करू नका! धनंजय मुंडेंना तर टार्गेट केलं तुम्ही पण आमचे दैवत वाल्मीक आण्णांना पण टार्गेट केलं. मला तुम्ही टार्गेट कशामुळे करत आहात कळायलंय. मी त्या बबन गित्तेच्या 302 मधला फिर्याद आहे. मला दोन गोळ्या लागल्या होत्या तेव्हा तुम्ही कुठे होतात. परळीत आणि माझ्या गावात जाऊन कुठल्याही महिलेला विचारा की गोटू गात्तेनं असं काही केलंय का म्हणून. त्यावेळेस मी स्वतः फाशी घेऊन मरतो किंवा असं पटरीवर पडून मरतो,” असं गित्तेनं म्हटलंय.
माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग
“तुम्ही तुमच्या राजकारणासाठी पोळ्या भाजू नका. मुखवटा चोरीचं माझ्यावर म्हणताय ते आळंदीतलं तुकाराम महाराजांचे ते मला नाव आठवण येत नाही. तुम्ही फक्त बातम्या म्हणू नका ते एफ आय आर काढा,” असंही गित्तेनं म्हटलंय. गोट्या गित्तेनं आव्हाड यांचा एकेरी उल्लेख करत, “हे बघ जितेंद्र आव्हाड तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग आहेत. ‘भाई तुम बडे, भाई सॉरी सॉरी…’ म्हणलेला. हे टाकतो मी खाली. अरे तू आहेस नेमका कुणाचा वंजाऱ्याच्या समाजाचा नाहीस तू. तू असं करायलास, तुला आता महागात पडणार आहे. मला फाशी भेटेल नाही भेटणार पण तुम्ही माझ्या दैवत का करायला असं? ही असं करूच नका ना तुम्ही. माझ्या जीवाभावाच्या बापू आंधळेचा मर्डर झाला. त्यावेळेस मला दोन गोळ्या लागल्या गोळी आरपार गेली म्हणून मी आज जिवंत आहे,” असं गित्तेनं म्हटलं आहे.
कधीचा आहे हा व्हिडीओ?
सराईत गुन्हेगार गोट्या गित्तेला पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथकं रवाना करण्यात आली आहेत. तरीही गोट्या पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. शनिवारी गोट्याचा एक व्हिडिओ समोर आला त्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीवजा मेसेज देण्यात आला आहे. गोट्याचा हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा असल्याचे समजते. गोट्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत. आंधळे खून प्रकरणात त्याच्यासह सात जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गोट्या सध्या एका गुन्ह्यातील जामीनावर बाहेर आहे.