अमरावती येथे महसूल दिनानिमित्त अपर आयुक्तांपासून शिपायापर्यंतच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले.
.
एक ते सात ऑगस्ट दरम्यान साजरा होणाऱ्या महसूल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अपर आयुक्त रामदास सिद्धभट्टी, उपायुक्त अजय लहाने, उपायुक्त सुरज वाघमारे, यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे आणि नगरविकास विभागाचे सह आयुक्त नितीन कापडनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, सह आयुक्त किरण पाणबुडे, उप जिल्हाधिकारी विवेक जाधव, सहायक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. तहसिलदार, नायब तहसिलदार, स्वीय सहायक, लघुलेखक, सहायक महसूल अधिकारी, वाहनचालक आणि शिपाई अशा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपायुक्त अजय लहाने यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यानंतर आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आपल्या प्रमुख भाषणात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात ध्यानसाधना आणि प्राणायामाचे महत्त्व विशद केले. त्यांच्या मते, कोणतेही काम आनंदाने केले पाहिजे. आनंदाने काम केल्यास ते अधिक प्रभावीपणे होते आणि त्यासाठी ध्यानसाधना व प्राणायाम आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताळमेळ शाखेच्या उपलेखापाल वैशाली दुधे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी भक्ती गीत गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.