Ajit Pawar on Mahadevi Elephant: कोल्हापुरातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आल्यानंतर आता तिला परत आणण्यासाठी मोहीम सुरु कऱण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नांदणीमधील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवल्यानंतर कोल्हापुरातील नागरिकांमध्ये संताप आहे. लोकप्रतिनिधीही जनतेच्या पाठीशी उभे असून, हत्तीणीला परत आणण्यासाठी लढा उभारणार असल्याचं सांगत आहेत. दरम्यान एका तरुणाने हीच नाराजी भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर बोलून दाखवली.
शिरोळ तालुक्यातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानातील मठात हत्ती पाळण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र-कर्नाटकातील जैन समाजाच्या सुमारे 748 गावांचं ते श्रद्धास्थान आहे. 1992 मध्ये महादेवी हत्तीणीला नांदणी मठात आणण्यात आलं होतं. 32 वर्षं तिने नांदणीत वास्तव्य केलं. पेटाने महादेवी हत्तीणीच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत लढा गेला. अखेर तिला वनताराला पाठवण्याचा निर्णय देण्यात आला.
एका तरुणाने भरसभेत अजित पवारांना हत्तीणीला परत आणण्याची मागणी केली. तो म्हणाला, “दादा, माधुरी हत्तीणीला वनताराला नेलं आहे तिला परत आणा. लय भावना दुखावल्या आहेत. ती कोल्हापुरची आहे”.
त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी म्हटलं की, “हत्तीणीबद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. आपण संविधान, कायद्याने देश चालवतो. जसा आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसा प्राणी आणि पक्ष्यांनाही आहे. त्याप्रकारे त्या हत्तीणीचं झालं, म्हणूनच ती गेली बाबा”. पुढे ते म्हणाले, “याला हत्तीणीचं लयच लागलंय बघा. तुला एकदा कुठं तरी हत्तीणीवर बसवतो”. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
‘महादेवी हत्तीणीला वनताराला पाठवणं म्हणजे षडयंत्राचा भाग’
नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला वनताराला पाठवणं म्हणजे षडयंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.. पेटा आणि वनतारा यांनी संगणमत करून महादेवी हत्तीण नांदणी मठातून घेऊन गेलेत असंदेखील शेट्टी म्हणाले आहेत. इतकंच नाही तर वनताराला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार कोणतीही मान्यता नसल्याचे माहिती अधिकारात उपलब्ध झाल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.
FAQ
महादेव हत्तीण कोण आहे?
महादेवी हत्तीण फक्त चार वर्षांची असताना नांदणीच्या मठात दाखल झाली होती. तब्बल 32 वर्षांनी तिचा कोल्हापुरातील सहवास संपुष्टात आला आणि वनतारामध्ये जावं लागलं आहे.
महादेवी हत्तीणीला वनताराला का नेलं?
पेटाने महादेवी हत्तीणीच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत लढा गेला. अखेर तिला वनताराला पाठवण्याचा निर्णय देण्यात आला.
महादेवी हत्तीणीचं वय किती?
महादेवी हत्तीणीचं वय आज 36 वर्षं आहे. 1992 मध्ये चार वर्षांची असताना तिला नांदणी मठात आणण्यात आलं होतं.