नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील पुरूषोत्तम सुरेश चौधरी (वय ३७) यांच्यावर योग्य उपचार न झाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे दोषींवर कारवाई केली जावी, या मागणीसाठी तेथील नागरिकांनी थेट जिल्हा कचेरी गाठून जिल्हाधिकारी याना निवे
.
पुरुषोत्तम चौधरी हे शेतातून घरी परतत असताना रानडुक्कर आडवे आल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या पायाला जखम झाली. दरम्यान उपचार करण्यात विलंब झाल्याने जखम चिघळली. त्यानंतर त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार दीर्घकाळ चालणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे ते दीड महिना दाखल होते. दवाखान्यात त्यांच्याजवळ पत्नीशिवाय कुणीही नव्हते. त्याच त्यांची सेवा सुश्रृषा करीत होत्या. पतीशिवाय त्यांना लहान तीन अपत्यांचाही सांभाळ करावा लागला.
याच दरम्यान डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेलाही बराच वेळ लागला, असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. त्यांनी वेळ का लागतो, अशी वारंवार विचारणा केली. परंतु डॉक्टर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि कालांतराने त्यांचा मृत्यू झाला. परंतु या काळात एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली. शस्त्रक्रिया करून बाहेर आणल्यानंतर त्यांच्या पोटावर शस्त्रक्रियेचे टाके दिसले. ऑपरेशन पायाच्या जखमेचे होते, तर मग पोटावर टाके कसे? ही गोष्ट लक्षात येताच विचारपूस केली. तर त्यावर अशास्त्रीय उत्तर देण्यात आले. पोटातील हाड काढून पायात टाकण्यात आले, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही बाब गावात माहित होताच गावातील लोक तिथे जाऊन पोहोचले आणि सर्व विचारपूस केली असता त्यांच्या पोटातून एखादा अवयव काढल्याचा दावा गावकऱ्यांनी केला.
त्यानंतर प्रशासनावर थोडा दबाव आल्याने त्यांनी व्हिडिओ शुटिंगसह शवविच्छेदन करतो असे सांगून तसे केले. आता शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करणे एवढेच नागरिकांच्या हातात आहे. परंतु या सर्व प्रकरणांमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा काही तरी लपवाछपवी होणार नाही, याची काळजी घेतली जावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. गावकऱ्यांच्या मते हे प्रकरण दडपण्यासाठी वाटेल ते प्रयत्न होत आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने त्यात बारकाईने लक्ष पुरवून न्याय मिळवून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.